
18 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर दरम्यान ओमानमध्ये इमर्जिंग आशिया कप 2024 खेळवला जाईल. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. आठ संघांपैकी पाच आशियाई क्रिकेट परिषदेचे पूर्ण सदस्य राष्ट्र असतील. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या स्पर्धेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. 15 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या खेळाडूला या स्पर्धेसाठी पाकिस्तान अ संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. गेल्या वेळीही याच खेळाडूच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने विजेतेपद पटकावले होते. जेव्हा पाकिस्तान अ संघाने अंतिम सामन्यात भारत अ संघाचा 128 धावांनी पराभव केला होता.
पाकिस्तानने 15 सामने खेळलेल्या खेळाडूची कर्णधार म्हणून केली नियुक्ती, 19 ऑक्टोबरला या स्पर्धेत होणार आहे भारताशी सामना
पाकिस्तानसाठी 9 टी-20 आणि सहा एकदिवसीय सामने खेळलेल्या मोहम्मद हरीसला इमर्जिंग अशिया कप 2024 साठी पाकिस्तान अ संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. तर अब्दुल समद, अहमद दानियाल, यासिर खान आणि जमान खान यांना पहिल्यांदाच पाकिस्तान अ संघात स्थान मिळाले आहे. 16 ऑक्टोबरला ओमानला रवाना होण्यापूर्वी पाकिस्तान संघ 11 ते 15 ऑक्टोबर दरम्यान कराचीतील हनिफ मोहम्मद हाय-परफॉर्मन्स सेंटरमध्ये शिबिरात सहभागी होणार आहे. या स्पर्धेत पाकिस्तान संघाला पहिला सामना भारताविरुद्ध खेळायचा आहे.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या 8 संघांची 2 गटात विभागणी करण्यात आली आहे. अ गटात श्रीलंका अ, बांगलादेश अ, अफगाणिस्तान अ आणि हाँगकाँग हे संघ आहेत. तर भारत अ, पाकिस्तान अ, यूएई आणि ओमान ब गटात आहेत. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचे संघ 19 ऑक्टोबरला भिडणार आहेत. या स्पर्धेतील पाकिस्तानचा दुसरा सामना 21 ऑक्टोबर रोजी यजमान ओमानशी होईल, त्यानंतर त्यांचा शेवटचा गट सामना 23 ऑक्टोबर रोजी UAE विरुद्ध होईल. त्याच वेळी, प्रत्येक गटातील टॉप-2 संघ 25 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. त्यानंतर रविवारी 27 ऑक्टोबरला अंतिम सामना खेळवला जाईल.
इमर्जिंग आशिया कपसाठी पाकिस्तानचा संघ: मोहम्मद हारिस (कर्णधार), अब्दुल समद, अहमद दानियाल, अराफत मिन्हास, हैदर अली, हसिबुल्ला, मेहरान मुमताज, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद इम्रान जूनियर, ओमेर बिन युसूफ, कासिम अक्रम, शाहनवाज दहनी, सुफियान मोकीम, यासिर खान आणि जमान खान .
संघ व्यवस्थापन: उमर रशीद (मुख्य प्रशिक्षक आणि व्यवस्थापक), इम्रान फरहत (फलंदाजी प्रशिक्षक), रिफतुल्लाह मोहम्मद (फील्डिंग प्रशिक्षक), उस्मान हाश्मी (विश्लेषक) आणि सय्यद मोहम्मद असद (फिजिओथेरपिस्ट).
