
महिला टी-20 विश्वचषक 2024 च्या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला. दुबईत शुक्रवारी 4 ऑक्टोबर रोजी झालेल्या सामन्यात न्यूझीलंड संघाने भारताचा 58 धावांनी पराभव केला. या पराभवानंतर टीम इंडियाचा स्पर्धेतील प्रवास जवळपास संपला आहे. उपांत्य फेरीत जाण्याची आशा फारच कमी दिसत आहे. दुसरीकडे, या पराभवाने 2021 च्या पुरुषांच्या T20 विश्वचषकाच्या जखमा पुन्हा एकदा ताज्या केल्या आहेत. त्यावेळीही याच मैदानावर न्यूझीलंड संघाने स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारताचा पराभव केला होता. यानंतर टीम इंडियाला उपांत्य फेरी गाठता आली नाही.
Women’s T20 World Cup : न्यूझीलंडकडून हरल्यानंतर संपला टीम इंडियाचा प्रवास? जाणून घ्या उपांत्य फेरीचे समीकरण
न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवानंतर टीम इंडियाचा प्रवास जवळपास संपला आहे. भारताचा मोठा पराभव हे सर्वात मोठे कारण आहे. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 160 धावा केल्या होत्या, ज्याच्या प्रत्युत्तरात टीम इंडियाने 102 धावा केल्या आणि 58 धावांनी पराभव पत्करावा लागला. यामुळे भारतीय संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर गेला आहे. तसेच नेट रन रेट खूपच खराब झाला आहे. टीम इंडिया सध्या एकही गुण न घेता -2.900 च्या NRR सह अ गटात 5व्या स्थानावर आहे.
भारतीय संघाचा प्रवास संपला मानला जात आहे, कारण आता 3 सामने बाकी आहेत आणि तिन्ही सामने जिंकणे आवश्यक झाले आहे. या सामन्यांमध्ये संघाला 6 ऑक्टोबरला प्रथम पाकिस्तानशी सामना करायचा आहे. 9 ऑक्टोबर रोजी आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत टीम इंडियाचा पराभव करणाऱ्या श्रीलंकेशी सामना होणार आहे. 13 ऑक्टोबर रोजी भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना आहे, जो 6 वेळा चॅम्पियन आहे आणि ज्यांच्याकडून अनेकदा पराभव पत्करावा लागला आहे.
सध्या टीम इंडियासाठी सेमीफायनलचा मार्ग कठीण झाला आहे. उर्वरित 3 सामन्यांमध्ये भारतीय संघ एकही सामना हरला, तर त्याची प्रगती इतर संघांच्या निकालावर अवलंबून असेल. मात्र गटातील टॉप-2 मध्ये राहून उपांत्य फेरीत जायचे असेल, तर भारतीय संघाने उर्वरित सर्व सामने जिंकणे हा सोपा उपाय आहे.
पुढचा सामना रविवारी 6 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध आहे. श्रीलंकेचा 31 धावांनी पराभव करून पाकिस्तान संघ 2 गुण आणि +1.550 च्या निव्वळ रनरेटसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांना मोठ्या फरकाने पराभूत करण्यात भारताला यश आले, तर निव्वळ धावगती सुधारू शकते. आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाने हे काम केले असले, तरी या स्पर्धेत ते सोपे नसेल. श्रीलंकेला हरवून निव्वळ धावगती सुधारण्याचीही संघाला संधी असेल. हे दोन सामने जिंकून एनआरआरमध्ये सुधारणा करण्यात संघ यशस्वी ठरला, तर उपांत्य फेरीचा मार्ग सुकर होईल.
