Irani Cup : हा गोलंदाज पृथ्वी शॉ-श्रेयस अय्यरसाठी आहे धडा, आठव्या क्रमांकावर येऊन शतक झळकावून रचला इतिहास, संघाला बनवले चॅम्पियन


रणजी ट्रॉफी 2024 चे विजेते संघ, मुंबई आणि रेस्ट इंडिया यांच्यात इराणी ट्रॉफीची स्पर्धा सुरू आहे. लखनौमध्ये सुरू असलेल्या या सामन्यात मुंबईचा गोलंदाज आठव्या क्रमांकावर आला आणि त्याने शतक झळकावले. या शतकाच्या जोरावर त्याने अजिंक्य रहाणे कर्णधार असलेल्या मुंबई संघाला पराभवापासून तर वाचवलेच, शिवाय इराणी चषकाचा चॅम्पियनही बनवला. एवढेच नाही, तर त्याने इराणी चषकात नवा विक्रमही रचला. टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी धडपडणाऱ्या पृथ्वी शॉ आणि श्रेयस अय्यरसाठी कोटियनची खेळी हा मोठा धडा आहे. संधी मिळूनही या दोन्ही फलंदाजांना त्याचा फायदा उठवता आला नाही.

इराणी चषकाच्या या सामन्यात, जिथे पृथ्वी शॉ आणि श्रेयस अय्यरसारखे तगडे फलंदाज मोठ्या धावा करण्यात अपयशी ठरले, तिथे उजव्या हाताचा फिरकी गोलंदाज तनुष कोटियनने आपले फलंदाजीचे पराक्रम सिद्ध केले. त्याने पहिल्या डावात 124 चेंडूत 64 धावा केल्या. यानंतर दुसऱ्या डावातही त्याने शतक झळकावले. यातील विशेष बाब म्हणजे या दोन्ही धावा त्याने 8व्या क्रमांकावर फलंदाजी करताना केल्या.

दोन्ही डावांमुळे कोटियनने इतिहास रचला आहे. इराणी चषकाच्या सामन्यात 8 व्या किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजी करताना दोनदा 50 पेक्षा जास्त धावा करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. दुसरीकडे, शॉला पहिल्या डावात 4 तर दुसऱ्या डावात 76 धावा करता आल्या. तर अय्यरला पहिल्या डावात 57 आणि दुसऱ्या डावात 8 धावा करता आल्या.

मुंबई संघाने हा इराणी चषक 15 व्यांदा जिंकला आहे. तनुष कोटियनचे यात महत्त्वाचे योगदान होते. प्रथम फलंदाजी करताना मुंबई संघाने 537 धावा केल्या होत्या, त्याला प्रत्युत्तरात शेष भारताचा संघ 416 धावा करू शकला. यासह मुंबई संघाला 121 धावांची आघाडी मिळाली. मुंबईकडून तनुष कोटियनने 3 बळी घेतले. यानंतर दुस-या डावात मुंबई फलंदाजीसाठी उतरली, तेव्हा ती गडबडली. चौथ्या दिवशी संघाने 125 धावांवर 6 विकेट गमावून पराभवाकडे वाटचाल सुरू केली होती. यानंतर कोटियन फलंदाजीला आला.

कोटियनने दोन महत्त्वाच्या भागीदारी केल्या, प्रथम सरफराज खान आणि नंतर मोहित अवस्थीसह. कोटियनने 114 धावांची नाबाद खेळी खेळली, ज्याच्या जोरावर रहाणेच्या संघाने 5व्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रापर्यंत दुसऱ्या डावात 8 गडी गमावून 329 धावा करण्यात यश मिळविले. त्याचबरोबर संघाची एकूण आघाडीही 440 धावांची झाली. सामना अनिर्णित राहिला असला, तरी नियमानुसार पहिल्या डावातील आघाडीमुळे मुंबई संघाला इराणी चषक चॅम्पियन घोषित करण्यात आले.