वर्ल्ड चॅम्पियनची खराब अवस्था, 8 फलंदाज करू शकले नाही दुहेरी आकड्याला स्पर्श, इंग्लंडने केला एवढ्या मोठ्या फरकाने पराभव


ऑस्ट्रेलियन संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये 5 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने दमदार कामगिरी करत 2-0 अशी आघाडी घेतली होती. पण या मालिकेत इंग्लंडने दमदार पुनरागमन केले आहे. इंग्लंडनेही सलग दोन सामने जिंकून मालिकेत बरोबरी साधली आहे. मालिकेतील चौथ्या सामन्यात विश्वविजेता संघ ऑस्ट्रेलियाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात त्यांचा एकही फलंदाज जास्त काळ मैदानावर टिकू शकला नाही.

उभय संघांमधील मालिकेतील चौथा एकदिवसीय सामना लंडनमधील लॉर्ड्स स्टेडियमवर खेळला गेला. पावसामुळे हा सामना 39-39 षटकांचाच खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो पूर्णपणे चुकीचा ठरला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या इंग्लंड संघाने 39 षटकांत 5 गडी गमावून 312 धावा केल्या. मात्र या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना ऑस्ट्रेलियन संघ 24.4 षटकात केवळ 126 धावा करून ऑलआऊट झाला आणि त्यांना 186 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.

या सामन्यात ऑस्ट्रेलियन फलंदाजांची अत्यंत खराब कामगिरी झाली. लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली. मिचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेड यांनी पहिल्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी केली. मात्र यानंतर एकही फलंदाज जास्त वेळ क्रीजवर टिकू शकला नाही, 8 फलंदाज दुहेरी आकडा गाठण्यातही अपयशी ठरले. ट्रॅव्हिस हेडने सर्वाधिक 34 धावा केल्या आणि मिचेल मार्शने 28 धावांची खेळी केली. त्याचवेळी इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी अत्यंत मारक गोलंदाजी केली. मॅथ्यू पॉट्सने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. याशिवाय ब्रेडन कारसेने तीन आणि जोफ्रा आर्चरने दोन गडी बाद केले.

इंग्लंडकडून या सामन्यात त्यांचा कर्णधार हॅरी ब्रूकने सर्वाधिक धावा केल्या. हॅरी ब्रूकने 11 चौकार आणि 1 षटकारासह 87 धावांची तुफानी खेळी खेळली. त्याचवेळी, बेन डकेटने 63 धावा केल्या आणि लियाम लिव्हिंगस्टोनने 27 चेंडूत 62 धावा करत डाव संपवला. यादरम्यान लियाम लिव्हिंगस्टोनने तीन चौकार आणि सात षटकार ठोकले. आता इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना रविवारी म्हणजेच 29 सप्टेंबर रोजी ब्रिस्टल येथील काऊंटी ग्राउंड स्टेडियमवर खेळवला जाईल, ज्यामुळे मालिकाही निश्चित होईल.