
अंबाती रायुडू आज 23 सप्टेंबरला त्याचा 39 वा वाढदिवस साजरा करत आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये रायुडू आंध्र प्रदेश तसेच हैदराबाद, बडोदा आणि विदर्भासाठी खेळला आहे. तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला आहे. राग आणि मारामारीसाठी प्रसिद्ध असलेल्या रायुडूची क्रिकेट कारकीर्द खूप वादग्रस्त राहिली आहे. तो नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहिला. रायुडूच्या रागामुळे त्याचे खूप नुकसान झाले. त्यामुळेच एकेकाळी भारताच्या महान फलंदाजांमध्ये गणल्या जाणाऱ्या रायुडूची आंतरराष्ट्रीय कारकीर्द अवघ्या 6 वर्षात संपुष्टात आली. इतकेच नाही,तर या काळात त्याचे पदार्पण लांबले आणि संघात आल्यानंतरही तो एकही कसोटी किंवा विश्वचषक सामना खेळू शकला नाही.
Birthday : पदार्पणाला उशीर, बीसीसीआयविरुद्ध बंड, नंतर रागाच्या भरात निवृत्ती, वादांच्या भोवऱ्यात राहिली अंबाती रायडूची कारकीर्द
अंबाती रायडूने 2002 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी 177 धावांची नाबाद खेळी केली होती. त्याच्या या खेळीमुळे भारताच्या अंडर-19 संघाने इंग्लंडचा पराभव केला. त्यामुळे रायुडू क्रिकेट तज्ज्ञांच्या नजरेत आला. यानंतर त्याने रणजी ट्रॉफीमध्ये हैदराबादसाठी एकाच सामन्यात द्विशतक आणि नंतर शतक झळकावून खळबळ उडवून दिली होती. रायुडू येथेच थांबला नाही. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने 2004 अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली होती.
इतके टॅलेंट दाखवल्यानंतर तो तरुण वयात टीम इंडियासाठी डेब्यू करेल, असे मानले जात होते. पण रायुडूच्या रागामुळे त्याचे नुकसान झाले. याचा परिणाम असा झाला की वयाच्या 20-21 व्या वर्षी पदार्पण करण्याऐवजी त्याला वयाच्या 27 व्या वर्षी संधी मिळाली. रायुडूने 24 जुलै 2013 रोजी हरारे येथे झिम्बाब्वेविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यानंतरही तो संघात आणि बाहेर जात राहिला.
अंबाती रायडूने वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी हैदराबादसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 2004 अंडर-19 विश्वचषकानंतर रणजी ट्रॉफीमध्येही त्याची खराब कामगिरी कायम राहिली. दरम्यान, हैदराबादचे प्रशिक्षक राजेश यादव यांच्याशी त्याचा वाद झाला, त्यानंतर तो संघ सोडून आंध्र प्रदेशकडून खेळायला गेला. रणजी ट्रॉफीच्या सामन्यादरम्यान हैदराबादच्या खेळाडूंशी त्याची भांडणे झाली होती. त्यानंतर हैदराबादकडून खेळणाऱ्या अर्जुन यादवने त्याच्यावर स्टंपने हल्ला केला होता.
रायुडू नुकताच या वादातून बाहेर पडला होता, जेव्हा 2007 मध्ये तो पुन्हा BCCI विरुद्ध बंड करून प्रसिद्धीच्या झोतात आला होता. वास्तविक, बीसीसीआयच्या मनाईनंतरही तो इंडियन क्रिकेट लीगमध्ये खेळायला गेला होता. त्यानंतर बीसीसीआयने या लीगला मान्यता दिली नाही. अशा परिस्थितीत बीसीसीआयने टीम इंडिया आणि बोर्डाशी संबंधित सर्व स्पर्धांवर बंदी घातली होती. तथापि, BCCI आणि ICC च्या विरोधामुळे इंडियन क्रिकेट लीग अवघ्या 2 वर्षांनंतर बंद झाली आणि 2009 मध्ये अंबाती रायडू वेगळा झाला.
इंडियन क्रिकेट लीगमध्ये सहभागी झाल्याबद्दल अंबाती रायडूला बीसीसीआयची माफी मागावी लागली. यानंतर देशांतर्गत क्रिकेट, आयपीएल आणि टीम इंडियाचे दरवाजे त्याच्यासाठी पुन्हा उघडले. आयपीएल 2010 मध्ये मुंबई इंडियन्सने त्याला 12 लाख रुपये देऊन संघात समाविष्ट केले. आयपीएलमध्ये रायडूने मुंबईसाठी प्रत्येक हंगामात चमकदार कामगिरी करण्यास सुरुवात केली आणि अनेक मोठे सामने जिंकवून दिले. आयपीएलमध्ये खेळतानाही त्याची झहीर खान आणि हरभजनसोबत भांडणे झाली, त्यामुळे तो वादात सापडला. दरम्यान, 2013 मध्ये त्याला टीम इंडियासाठी कॉल आला, पण त्याला फारशा संधी मिळाल्या नाहीत.
2013 मध्ये एकदिवसीय आणि 2014 मध्ये T20 आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या रायुडूला एकही कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. T20 मध्येही तो फक्त 6 सामने खेळू शकला, ज्यामध्ये त्याने फक्त 42 धावा केल्या. दुसरीकडे, एकदिवसीय सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी करूनही तो संघात आणि बाहेर जात राहिला. 2015 च्या विश्वचषकादरम्यान तो भारतीय संघाचा भाग होता, पण त्याला एकही सामना मिळाला नाही. त्यानंतर मधल्या काळात एक-दोन वर्षे त्याची कामगिरी फारशी चांगली राहिली नाही आणि त्याला संघातून वगळण्यात आले. 2018 च्या आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी केल्यानंतर तो परतला, पण 2019 च्या विश्वचषकासाठी त्याची निवड झाली नाही. यावरून बराच गदारोळ झाला. रायुडूला यामुळे खूप नाराज झाला आणि त्याने रागाच्या भरात निवृत्ती घेतली.
