अफगाणिस्तानने रचला इतिहास, पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेचा एकदिवसीय मालिकेत केला पराभव


अफगाणिस्तान संघाने शुक्रवारी, 20 सप्टेंबर रोजी सलग दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. शारजाह येथे झालेल्या या सामन्यात हशमतुल्ला शाहिदीच्या नेतृत्वाखाली संघाने 177 धावांनी विजय मिळवला. हा त्यांचा वनडेतील सर्वात मोठा विजय आहे. यासह 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेत संघाने इतिहास रचला आहे. दक्षिण आफ्रिकेचा वनडे मालिकेत पहिल्यांदाच पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने 312 धावांचे लक्ष्य ठेवले होते, ज्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ केवळ 134 धावांत गारद झाला.

अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्ला शाहिदीने शारजाहमध्ये नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. रहमानउल्ला गुरबाजच्या 105 धावा आणि अजमतुल्ला उमरझाईच्या झंझावाती 86 धावांच्या जोरावर संघाने 311 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेसाठी कर्णधार टेंबा बावुमाने टोनी डी जॉर्जीसोबत 73 धावांची सलामी दिली. त्यानंतर बावुमा ओमरझाईचा बळी ठरला आणि तो बाद होताच विकेट्सचा भडका उडाला. दक्षिण आफ्रिकेने 61 धावा करताना सर्व 10 विकेट गमावल्या.

अझमतुल्ला ओमरझाईने दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का दिला. यानंतर संघाचा अनुभवी फिरकी गोलंदाज राशिद खान आणि नंगेलिया खरोटे यांनी गोलंदाजीची जबाबदारी सांभाळली. या दोन गोलंदाजांसमोर बावुमाच्या संघाने शरणागती पत्करली. या दोघांनी मिळून 9 फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. राशिदने 9 षटकात केवळ 19 धावा देत 5 विकेट घेतल्या. तर नांगेलियाने 6.2 षटके टाकली आणि 26 धावांत 4 बळी घेतले. अशाप्रकारे दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ केवळ 134 धावांवर पत्त्यासारखा कोसळला. पहिल्या एकदिवसीय सामन्यातही संपूर्ण संघ 106 धावांत ऑलआऊट झाला होता, ज्याचा अफगाणिस्तानने सहज पाठलाग केला.

अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्ला शाहिदीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. संघाच्या सलामीवीरांनी त्याच्या निर्णयाला पूर्णपणे योग्य ठरवले. रहमानउल्ला गुरबाज आणि रियाझ हसन यांनी मिळून पहिल्या विकेटसाठी 88 धावांची भागीदारी केली. यानंतर अफगाणिस्तानला पहिला धक्का बसला, त्यानंतर गुरबाजने रहमत शाहच्या साथीने संघासाठी 101 धावांची भर घातली.

189 च्या स्कोअरवर रहमत शाहही 50 धावा करून बाद झाला. तो बाद झाल्यानंतर अझमतुल्ला ओमरझाई चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि त्याने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांवर कहर केला. त्याने 172 च्या स्ट्राईक रेटने केवळ 50 चेंडूत 86 धावा केल्या, ज्यात 6 षटकार आणि 5 चौकारांचाही समावेश होता. दुसरीकडे, गुरबाजने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील 7 वे शतक झळकावले. त्याने 110 चेंडूत 105 धावांची खेळी खेळली.