
2 तास 33 मिनिटांचा फवाद खान स्टारर पाकिस्तानी चित्रपट ‘द लीजेंड ऑफ मौला जट्ट’ त्याच्या शेजारच्या देश भारतात रिलीज होण्यासाठी दोन वर्षे वाट पाहावी लागली. ‘द लीजेंड ऑफ मौला जट्ट’ हा पाकिस्तानी चित्रपटांच्या इतिहासातील सर्वात महागडा आणि सर्वात मोठा चित्रपट आहे. ज्या वेळी हा चित्रपट पाकिस्तान, अरब देशांसह जगातील अनेक देशांमध्ये धुमाकूळ घालत होता, त्या वेळी भारतातील सिनेप्रेमींनाही तो पाहण्याची आशा होती. दोन्ही देशांमधील अनेक अडचणी आणि राजकीय परिस्थितीचा सामना केल्यानंतर अखेर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
70 कोटींचे बजेट, 400 कोटींची कमाई, 2 तास 33 मिनिटे कालावधी, भारतात पोहोचायला ‘द लीजेंड ऑफ मौला जट्ट’ला का लागली दोन वर्षे?
‘द लीजेंड ऑफ मौला जट्ट’ 12 ऑक्टोबर 2022 रोजी पाकिस्तानमध्ये रिलीज झाला होता. हा चित्रपट दिग्दर्शक, कलाकार आणि निर्मात्यांच्या मेहनतीचे फळ आहे. तो तयार करण्यासाठी सुमारे 10 वर्षे लागली. ‘द लीजेंड ऑफ मौला जट्ट’मध्ये पाकिस्तानचे सर्वात मोठे कलाकार होते. फवाद खान, माहिरा खान, हमजा अली अब्बासी, हुमैमा मलिक, गौहर रशीद, शमून, शफकत चीमा, अदनान जाफर, फारिस साफी, अहसान खान आणि बाबर अली यांसारख्या अनेक स्टार्सनी यात काम केले. या चित्रपटाचे दिग्दर्शन बिलाल लाशारी यांनी केले होते. बिलालने नासिर अदीबसोबत चित्रपटाचे लेखन केले. बिलाल लशारी, अम्मारा हिकमत आणि अली मुर्तझा यांनी चित्रपटाची निर्मिती केली.
‘द लीजेंड ऑफ मौला जट्ट’ बनवण्यासाठी निर्मात्यांनी सुमारे 70 कोटी रुपये (पाकिस्तानी रुपये) खर्च केले. हा पाकिस्तानचा सर्वात महागडा चित्रपट असल्याचे सांगण्यात आले. चित्रपटाची ट्रीटमेंटही भव्य होती. हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा पाकिस्तानसह जगातील अनेक देशांतील चित्रपटगृहांमध्ये हाऊसफुल्लचे बोर्ड लावावे लागले. हा चित्रपट पाकिस्तान, UK, UAE, सौदी अरेबिया, नॉर्वे, डेन्मार्क, बहरीन, नेदरलँड, ओमान, जर्मनी, कुवेत, फ्रान्स, स्वीडन, स्पेन, न्यूझीलंड, सिंगापूर आणि मलेशियासह 25 देशांमध्ये 500 हून अधिक स्क्रीनवर प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्या वीकेंडमध्ये जगभरात सुमारे 51 कोटी रुपयांची (पाकिस्तानी रुपये) कमाई केली. या चित्रपटाने जगभरात 400 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला.
फवाद खान आणि माहिराचा हा चित्रपट डिसेंबर 2022 मध्ये भारतात प्रदर्शित होणार होता. झी स्टुडिओजकडे ‘द लीजेंड ऑफ मौला जट्ट’ चे वितरण हक्क आहेत. मात्र त्यावेळी हा चित्रपट वादामुळे पुढे ढकलण्यात आला होता. त्यावेळी, सिनेमा चेन आयनॉक्सच्या प्रवक्त्याने सांगितले होते, “वितरकाने कळवले आहे की भारतात चित्रपटाचे प्रदर्शन अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. “आम्हाला कोणतीही नवीन तारीख देण्यात आलेली नाही किंवा आम्हाला रिलीज थांबवण्याचे कारण सांगितले गेले नाही.” त्यावेळी झी स्टुडिओ हा चित्रपट दिल्ली आणि पंजाबमध्ये प्रदर्शित करणार होते. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची चर्चा होताच मनसेनेही या चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध केला आहे.
हा चित्रपट बऱ्याच दिवसांनी भारतात प्रदर्शित होत आहे. पण पाकिस्तानात तो सहजासहजी रिलीज झाला असे नाही. ‘द लीजेंड ऑफ मौला जट्ट’ 2019 मध्येच रिलीज होणार होता. निर्मात्यांनी 2018 मध्ये याची घोषणाही केली होती. चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित होताच चित्रपट अडचणीत सापडला आहे. वास्तविक 1979 साली ‘मौला जट्ट’ नावाने एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याचे निर्माते सरवर भाटी बिलाल होते. चित्रपटाचा फर्स्ट लूक पाहताच त्यांनी कोर्टात जाऊन कॉपीराईट केस दाखल केली आणि प्रकरण अडकले. सुमारे दोन वर्षे खटला चालला. सरतेशेवटी, दोन्ही पक्षांनी सहमती दर्शवली तोपर्यंत कोरोना विषाणूने दार ठोठावले होते. चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आणि तो 2022 मध्ये रिलीज केला.
‘द लीजेंड ऑफ मौला जट्ट’ हा युनूस मलिकच्या पाकिस्तानी चित्रपट ‘मौला जट्ट’वर आधारित होता. याला चित्रपटाचे रीबूट म्हटले गेले. चित्रपटाची कथा मौला जट्ट (फवाद खान) आणि नूरी जट्ट (हमजा अली अब्बासी) यांच्यातील वैर भावनाभोवती फिरते. जगभरात या चित्रपटाला ज्याप्रकारे पसंती मिळाली आहे, त्यामुळे तो भारतात चांगला व्यवसाय करू शकेल, अशी अपेक्षा आहे.
