
जगाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या परंपरा आहेत. इंडोनेशियाची ही विचित्र परंपरा संपूर्ण जगाला चकित करत आहे. आपल्या देशात, आपल्या प्रियजनांच्या स्मरणार्थ दरवर्षी गरजूंना अन्न दिले जाते, तर दक्षिण सुलावेसीमध्ये एक समुदाय आहे, जो त्यांच्या मृत नातेवाईकांची विचित्र पद्धतीने आठवण करतो.
कबरीतून बाहेर काढतात मृतदेह, त्यांना घालतात नवीन कपडे आणि सिगारेट ओढायला लावतात; चर्चेत आहे विचित्र परंपरा
इंडोनेशियातील दक्षिण सुलावेसी येथील डोंगराळ भागात राहणारी टोराजा जमात मृतांच्या मृतदेहांची ममी बनवतात आणि जतन केलेल्या मृतदेहांची जपणूक करतात जणू ते जिवंत आहेत. या जमातीच्या लोकांचा असा विश्वास आहे की मृत्यूनंतर आत्मा घरातच राहतो, त्यामुळे मृतदेहांना अन्न, कपडे, पाणी देण्याबरोबरच ते त्यांना सिगारेटही ओढायला देतात.
तोराजा जमातीमध्ये प्रेताला दररोज अन्नदान करून घरातील वेगळ्या खोलीत आरामात पडून ठेवण्याची परंपरा आहे. कुटुंब योग्य अंत्यसंस्कार करू शकत नाही, तोपर्यंत हे केले जाते. कारण, या काळात म्हशींपासून ते डुकरांपर्यंत सर्वांचा बळी दिला जातो. जमात जितकी श्रीमंत तितके जास्त प्राणी बळी दिले जातात. तोराजा लोकांचा असा विश्वास आहे की उशीरा दफन केल्याने देखील शोक प्रक्रियेस मदत होते.
मात्र, मृतांना थडग्यात दफन केल्यानंतर येथील लोक त्यांना विसरतात, असे नाही. दरवर्षी येथे एक अनोखा विधी केला जातो, त्याला माने म्हणतात. हा एक प्रकारचा अंत्यविधी सोहळा आहे, जो पीक पेरणीपूर्वी ऑगस्ट महिन्यात साजरा केला जातो. या अंतर्गत तोराजा लोक त्यांच्या मृत पूर्वजांना त्यांच्या कबरीतून बाहेर काढतात आणि त्यांची स्वच्छता करतात. मग ते नवीन कपडे घालतात. यानंतर ते त्यांच्याशी जिवंत माणसांसारखे बोलतात आणि उत्सव साजरा करतात. ते त्यांना खायला घालतात आणि सिगारेटही देतात. मग ते पुन्हा दफन करतात. तोराजा लोक मृतांना जिवंत आत्मा मानतात.
