
बांगलादेश संघाने अलीकडेच पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत 2-0 असा ऐतिहासिक विजय नोंदवला. बांगलादेशने पहिल्यांदाच पाकिस्तानचा कसोटी सामना आणि मालिकेत पराभव केला आहे. त्यामुळे कर्णधार नजमुल हसन शांतोसह संघातील सर्व खेळाडूंचा आत्मविश्वास शिगेला पोहोचला आहे. भारताला कडवी टक्कर देण्यासाठी त्यांनी ढाका येथे तळ ठोकून तयारी सुरू केली आहे. दरम्यान, भारतातील कसोटी सामन्यादरम्यान वापरण्यात येणाऱ्या एसजी चेंडूने बांगलादेश संघाची झोप उडवली आहे. एसजीच्या अधिकृत वेबसाइटवर, एसजी टेस्ट LE रेड क्रिकेट लेदर बॉलची किंमत 3600 रुपये आहे. आता संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज लिटन दासने या 3600 रुपयांच्या चेंडूची भीती व्यक्त केली असून कुकाबुराऐवजी एसजीने खेळणे आव्हानात्मक असल्याचे म्हटले आहे.
3600 रुपयांच्या चेंडूने उडवली बांगलादेशची झोप, भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी लिटन दासने व्यक्त केली ही भीती
बांगलादेशचा कर्णधार नजमुल हसन शांतोने पाकिस्तानला हरवल्यानंतर भारताला कडवी झुंज देण्याचा इशारा दिला होता. मात्र, ढाक्यातील तयारीदरम्यान त्याचा संघ एसजी चेंडूबाबत चिंतेत आहे. लिटने दासने पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात शतक झळकावून बांगलादेशला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. आता भारतात जाताच चेंडू बदलेल आणि खेळणे आव्हानात्मक असेल, असे त्याने म्हटले आहे.
लिटन दासने यामागचे कारण सांगितले की, एसजी बॉल कुकाबुरापेक्षा मऊ आहे. त्यामुळे नवीन एसजी बॉल खेळणे थोडे सोपे आहे. पण जसजसा चेंडू जुना होतो, तसतसा तो अडचणी निर्माण करू लागतो. त्याच वेळी, पाकिस्तानमध्ये वापरल्या जाणाऱ्या नवीन कूकाबुरा चेंडूने खेळणे थोडे कठीण होते. मात्र, जसजसा तो जुना होत गेला तसतसे खेळणे सोपे झाले.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने टीम इंडियाविरुद्धची तयारी मजबूत करण्यासाठी ढाका येथे कसोटी शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात खेळाडू घाम गाळत आहेत. दरम्यान, संघाचा वरिष्ठ खेळाडू शाकिब अल हसन इंग्लंडमध्ये आपल्या गोलंदाजीला धार लावत आहे. हा संघ 15 सप्टेंबरला भारतात येईल, तर पहिला सामना 19 सप्टेंबरला चेन्नईत खेळवला जाईल.
भारतीय क्रिकेट बोर्डही ही मालिका हलक्यात घेण्याचा प्रयत्न करत नाही. 13 ते 18 सप्टेंबर दरम्यान चेन्नईत टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी शिबिर आयोजित करण्याची घोषणाही त्यांनी केली आहे. त्यात निवड झालेल्या सर्व खेळाडूंनी उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
बांगलादेशचा भारताविरुद्धचा कसोटी विक्रम खूपच खराब आहे. या संघाने भारताविरुद्ध 13 सामने खेळले असून त्यांना एकदाही पराभव करता आलेला नाही. या कालावधीत भारताने 11 सामने जिंकले आहेत, तर 2 सामने अनिर्णित राहिले आहेत. दुसरीकडे रविचंद्रन अश्विन अनेकदा बांगलादेशसाठी आपत्तीजनक ठरला आहे. त्याने बांगलादेशविरुद्धच्या 6 सामन्यात एकूण 23 विकेट घेतल्या आहेत.
