बॉलीवूड सेलिब्रिटींमध्ये सर्वाधिक मालमत्ता कोणाकडे आहे, असे विचारले तर प्रत्येकाचे उत्तर असेल शाहरुख खान किंवा सलमान खान. पण तसे नाही, या फिल्मी दुनियेत एक असा निर्माता आहे, ज्याने संपत्तीच्या बाबतीत सगळ्यांना मागे टाकले आहे. सलमान, शाहरुख आणि आमिर या तिन्ही खानांची संपूर्ण संपत्ती एकत्र केली, तरी ती या चित्रपट निर्मात्याच्या एकूण संपत्तीपेक्षा कमीच असेल. आम्ही बोलत आहोत रॉनी स्क्रूवालाबद्दल, ज्यांनी ‘उरी- द सर्जिकल स्ट्राइक’, ‘केदारनाथ’ आणि इतर अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. रॉनी हे आरएसव्हीपी फिल्म प्रोडक्शन कंपनीचे संस्थापक आहेत.
तो निर्माता, ज्याच्याशी कमाईच्या बाबतीत शाहरुख, सलमान आणि आमिर खान मिळूनही करू शकत नाही स्पर्धा !
रॉनीचा जन्म मुंबईत झाला आणि त्याने शाळा-कॉलेजचे शिक्षण तिथेच पूर्ण केले. शालेय जीवनापासूनच रॉनीला रंगभूमीची आवड होती, त्यामुळे तो बॉम्बे थिएटरमध्ये नाटक करु लागला. ‘शेक्सपियर्स ऑथेलो’ आणि ‘डेथ ऑफ अ सेल्समन’ यांसारख्या अनेक महान नाटकांमध्ये त्याने भाग घेतला. 1990 मध्ये रॉनीने 37 हजार रुपये गुंतवून यूटीव्ही नावाचे पहिले टेलिव्हिजन प्रोडक्शन हाऊस सुरू केले. हळूहळू त्याने त्याचे एका मीडिया ग्रुपमध्ये रूपांतर केले, ज्यामध्ये फिल्म प्रोडक्शन स्टुडिओ यूटीव्ही मोशन पिक्चर्सचाही समावेश होता.
यूटीव्ही प्रोडक्शन हाऊसच्या बॅनरखाली अनेक चित्रपट बनवले गेले, ज्यात ‘स्वदेश’, ‘रंग दे बसंती’, ‘बर्फी’ आणि ‘हैदर’ यांचा समावेश आहे. नंतर 2012 मध्ये रॉनीने हे उत्पादन वॉल्ट डिस्नेला 3.7 हजार कोटी रुपयांना विकले. यूटीव्ही विकल्यानंतर, रॉनीने आरएसव्हीपी फिल्म प्रोडक्शन कंपनी सुरू केली, ज्याच्या बॅनरखाली ‘रात अकेली है’, ‘सोनचिरिया’, ‘द स्काय इज पिंक’, ‘सॅम बहादूर’, ‘तेजस’ सारखे उत्कृष्ट चित्रपट बनवले गेले. यातील बहुतांश चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.
नुकत्याच जाहीर झालेल्या हुरुन इंडिया रिच लिस्टमध्ये रॉनी स्क्रूवाला याची संपत्ती 13 हजार कोटींहून अधिक असल्याचे सांगण्यात आले. जर आपण तिन्ही खानांशी तुलना केली, तर या यादीनुसार, शाहरुख खानची संपत्ती 7,300 कोटी रुपये, सलमान खानची 2,900 कोटी रुपये आणि दुसऱ्या अहवालानुसार, आमिर खानची एकूण संपत्ती 1800 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. तिन्हींची निव्वळ संपत्ती जरी एकत्र जोडली तरी ती रॉनीपेक्षा कमी आहे.
फिल्म इंडस्ट्रीत येण्यापूर्वी रॉनीने टूथब्रश बनवणारी कंपनी सुरू केली होती. या कंपनीचे नाव लेझर होते. यानंतर रॉनीने स्वतःची केबल टेलिव्हिजन कंपनी सुरू केली. रॉनीने पत्नी जरीना मेहतासोबत स्वदेश फाऊंडेशन देखील सुरू केले, ज्यामध्ये गरीब लोकांना मदत केली जाते. याद्वारे अन्न, शिक्षण, नोकरी, आरोग्य या प्रश्नांची दखल घेतली जाते. शाहरुख खानच्या ‘स्वदेश’ या चित्रपटातून प्रेरित होऊन 2004 मध्ये त्यांनी हे फाउंडेशन सुरू केले.