
कंगना राणावतचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट 6 सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता, तो आता होताना दिसणार नाही. 1 सप्टेंबरच्या संध्याकाळी चित्रपट पुढे ढकलल्याची बातमी समोर आली. या चित्रपटात शिखांना चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आले आहे, अशी याचिका पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. पंजाबमध्ये चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्याचीही मागणी होत आहे.
कंगना राणावतचा ‘इमर्जन्सी’ झाला पोस्टपोन, साऊथच्या या दोन चित्रपटांना लागली लॉटरी
वादांमुळे हा चित्रपट पुढे ढकलण्यात आला आहे. आता हा चित्रपट चित्रपटगृहात कधी येणार? याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. कंगनाचा हा चित्रपट पुढे ढकलल्यामुळे आता साऊथच्या दोन मोठ्या चित्रपटांना फायदा होणार आहे. ते दोन चित्रपट कोणते आहेत आणि ते कसे फायदेशीर ठरतील, जाणून घेऊया.
1. गॉट – या यादीतील पहिला चित्रपट म्हणजे थलपथी विजयचा ‘गॉट’, जो एक ॲक्शन साय-फाय चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन व्यंकट प्रभू यांनी केले आहे. यात विजय दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर 17 ऑगस्ट रोजी रिलीज झाला होता, जो लोकांना खूप आवडला होता. या चित्रपटाचा ट्रेलर आल्यापासून चाहत्यांमध्ये या चित्रपटाची उत्सुकता आहे. हा चित्रपट 5 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. तमिळ आणि तेलुगूसोबतच हा चित्रपट हिंदीतही प्रदर्शित होणार आहे.
अशा परिस्थितीत कंगनाचा ‘इमर्जन्सी’ 6 सप्टेंबरला रिलीज झाल्याने हिंदीतील ‘गॉट’च्या कमाईवर परिणाम होऊ शकला असता. मात्र, आता विजयच्या चित्रपटाचा मार्ग मोकळा झाला आहे. या चित्रपटातून विजय लोकांवर काय जादू करतो हे पाहावे लागेल. त्याच्यासोबत मीनाक्षी चौधरी आणि मालविका शर्मा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
2. थांगलान- या यादीतील दुसरे नाव विक्रमच्या ‘थांगलान’चे आहे. या चित्रपटात कोलार गोल्ड फील्डमध्ये काम करणाऱ्या मजुरांची कथा दाखवण्यात आली आहे. 19व्या शतकातील या चित्रपटात विक्रमने आदिवासी समाजाच्या नेत्याची भूमिका साकारली आहे. 15 ऑगस्टला हा चित्रपट तेलगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित झाला. आता तो 6 सप्टेंबरला हिंदीत प्रदर्शित होत आहे.
‘इमर्जन्सी’ पुढे ढकलल्यामुळे हा चित्रपट उत्तर भारतातही चांगली कमाई करू शकतो. या चित्रपटात विक्रमसोबत मालविका मोहनन देखील आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी रणजीतने घेतली आहे. ‘थांगलान’ आधी 30 ऑगस्टला हिंदीत प्रदर्शित होणार होता. पण नंतर निर्मात्यांनी हा चित्रपट 6 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलला.
दरम्यान कंगनाच्या ‘इमर्जन्सी’मध्ये इतरही अनेक मोठे कलाकार दिसणार आहेत. महिमा चौधरी, श्रेयस तळपदे, अनुपम खेर, मिलिंद सोमण यांसारखे कलाकार या चित्रपटाचा भाग आहेत. या चित्रपटामध्ये कंगनाने देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. अभिनयासोबतच कंगनाने या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. सुरुवातीला कंगनाने नोव्हेंबर 2023 मध्येच हा पिक्चर रिलीज करण्याचा निर्णय घेतला होता, पण नंतर रिलीज पुढे ढकलण्यात आला. त्यानंतर माहिती आली की हा चित्रपट जून 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे. मात्र त्यावेळीही तो होऊ शकला नाही आणि पुन्हा रिलीज पुढे ढकलण्यात आले.
