टीम इंडियात पुनरागमन करण्याच्या इराद्याने त्याने मारले सर्वाधिक चौकार, या खेळाडूला आहे सलग दुसऱ्यांदा हा विक्रम करण्याची संधी


महाराजा T20 ट्रॉफी 2024 आता अंतिम सामन्याच्या अगदी जवळ आहे. लीगच्या अंतिम फेरीतील संघांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. अंतिम फेरीत म्हैसूर वॉरियर्सचा सामना बंगळुरू ब्लास्टर्सशी होणार आहे. म्हैसूर वॉरियर्सची ही सलग दुसरी फायनल असेल. तर बंगळुरू ब्लास्टर्सने प्रथमच अंतिम फेरी गाठली आहे. या सामन्यात सर्वांच्या नजरा टीम इंडियात पुनरागमन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या खेळाडूवर असतील आणि, त्यासाठी तो सातत्याने प्रयत्नही करत आहे. आम्ही बोलत आहोत करुण नायरबद्दल, ज्याची इच्छा पुन्हा भारतीय कसोटी संघात परतण्याची आहे. पण सध्या तो चर्चेत आहे, कारण त्याला महाराजा T20 ट्रॉफी 2024 मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनण्याची संधी आहे.

करुण नायर महाराजा T20 ट्रॉफी 2024 मध्ये सर्वाधिक चौकार मारणारा फलंदाज ठरला आहे. जर म्हैसूर वॉरियर्सच्या कर्णधाराने बंगळुरू ब्लास्टर्सविरुद्धच्या अंतिम सामन्यात आणखी 14 धावा केल्या, तर तो या लीगमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडूही होऊ शकतो. अंतिम सामन्यापर्यंत करुण नायरने 11 सामन्यात 27 षटकार आणि 52 चौकारांच्या मदतीने 494 धावा केल्या आहेत. त्याच्या बॅटने मारलेले 52 चौकार हे लीगमधील कोणत्याही फलंदाजाने मारलेले सर्वाधिक चौकार आहेत. अंतिम सामन्यानंतर चौकारांची संख्या आणखी वाढू शकते.

सध्या, महाराजा T20 ट्रॉफी 2024 मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू शिवमोग्गा लायन्सचा फलंदाज अभिनव मनोहरच्या नावावर आहे, ज्याने 10 सामन्यांमध्ये 52 षटकारांसह 507 धावा केल्या आहेत. करुण नायर अभिनव मनोहरचा षटकारांचा विक्रम मोडू शकत नाही. पण त्याला महाराजा टी-20 ट्रॉफीमध्ये सलग दुसऱ्यांदा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनण्याची संधी आहे आणि हे काम 14 धावा करून करता येईल.

महाराजा टी-20 ट्रॉफीच्या गेल्या मोसमातही करुण नायर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. गेल्या मोसमात त्याने 12 सामन्यांत 532 धावा केल्या होत्या. या मोसमाच्या अंतिम सामन्यात करुणने आणखी 39 धावा केल्या, तर तो त्याचा मागील मोसमातील सर्वाधिक धावांचा विक्रमही मोडू शकतो.

करुण नायरच्या नेतृत्वाखालील म्हैसूर वॉरियर्सला गेल्या वेळी महाराजा टी-20 ट्रॉफीच्या अंतिम फेरीत हुबळी टायगर्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता. यावेळी त्याला हरायला नाही, तर हरवायला आवडेल. आता, बंगळुरू ब्लास्टर्स त्याच्यासमोर किती मोठे आव्हान उभे करते, यावरही अवलंबून असेल.

करुण नायरने 2016 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताकडून कसोटी पदार्पण केले होते. त्याने पदार्पणाच्याच डावात त्रिशतक झळकावले. पण, त्या मोठ्या खेळीनंतर त्याला पुढे काही विशेष करता आले नाही आणि तेच अपयश त्याच्या हकालपट्टीचे कारण ठरले. महाराजा T20 ट्रॉफी दरम्यान खुद्द करुण नायरने एका मुलाखतीत सांगितले की तो भारतीय कसोटी संघात पुनरागमन करण्यासाठी किती उत्सुक आहे. आता त्याची उत्सुकता आपल्या मुक्कामापर्यंत किती दिवसात पुर्ण होणार हे पाहायचे आहे.