शिखर धवनचा यू-टर्न? निवृत्तीनंतर केवळ 2 दिवसांनी केली क्रिकेट खेळण्याची घोषणा


भारतीय संघाचा अनुभवी सलामीवीर शिखर धवनने दोन दिवसांपूर्वी 24 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्याच्या या निर्णयाने त्याच्या चाहत्यांची मने तुटली. आता तो क्रिकेटच्या मैदानावर कधीच दिसणार नाही, असे वाटत होते. त्यामुळे त्याचे चाहते दु:खी होते, मात्र आता त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. निवृत्तीनंतर अवघ्या दोन दिवसांनीच धवनने क्रिकेट खेळण्याची घोषणा केली आहे. तो लवकरच मोठ्या दिग्गजांशी स्पर्धा करताना दिसणार आहे. धवनचा हा निर्णय जाणून घेतल्यावर तुमच्या मनात हा प्रश्न निर्माण होऊ शकतो की त्याने निवृत्तीवरुन यू-टर्न घेतला का? चला तर मग तुम्हाला त्याचे संपूर्ण सत्य सांगतो.

निवृत्ती घेऊन शिखर धवनने क्रिकेटला नव्हे, तर केवळ आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटलाच अलविदा केला आहे. तो अजूनही तंदुरुस्त आहे आणि लीग क्रिकेट खेळण्यास सक्षम आहे. टीम इंडियाच्या अनुभवी सलामीवीराने पीटीआयला दिलेल्या निवेदनात खुलासा केला आहे की, आतापासून तो लेजेंड्स लीग क्रिकेट (LLC) मध्ये खेळताना दिसणार आहे. यावरून त्याने निवृत्तीवरुन यू-टर्न घेतलेला नसून लीग क्रिकेट खेळण्याची घोषणा केल्याचे स्पष्ट होते.

धवन म्हणाला की क्रिकेट अशी गोष्ट आहे, जी त्याच्यापासून कधीही हिरावून घेतली जाऊ शकत नाही. क्रिकेट त्याच्यापासून कधीच दूर जाणार नाही. त्याचे शरीर पूर्णपणे तंदुरुस्त असून या खेळासाठी आवश्यक असलेले सर्व निकष तो पूर्ण करतो. त्यामुळे या लीगमध्ये खेळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बीसीसीआयच्या नियमांनुसार भारतीय खेळाडू निवृत्तीपूर्वी आयपीएलशिवाय इतर कोणत्याही लीगमध्ये खेळू शकत नाहीत. मात्र, हा नियम आता धवनला लागू होणार नाही.

निवृत्त खेळाडू लेजेंड्स लीग क्रिकेटमध्ये भाग घेतात. यामध्ये इरफान पठाण, सुरेश रैना असे अनेक निवृत्त भारतीय खेळाडू अजूनही खेळत आहेत. ख्रिस गेलसह अनेक परदेशी खेळाडूही या लीगचा भाग आहेत. एलएलसी 2020 मध्ये सुरू झाली आणि 4 हंगाम खेळले गेले. हरभजन सिंगच्या नेतृत्वाखाली मणिपाल टायगर्सने 2023 च्या हंगामात ट्रॉफी जिंकली होती. त्याचा 5वा सीझन सप्टेंबरमध्ये सुरू होत आहे, ज्यामध्ये धवनही दिसणार आहे.