निकोलस पूरनचा दक्षिण आफ्रिकेवर हल्लाबोल, 26 चेंडूत संपवला खेळ !


3 सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजने दक्षिण आफ्रिकेचा वाईट पराभव केला आहे. त्रिनिदाद येथे झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 177 धावांचे लक्ष्य दिले होते. वेस्ट इंडिजने 13 चेंडू शिल्लक असताना त्याचा पाठलाग केला. या विजयाचा सर्वात मोठा हिरो ठरला निकोलस पुरन. त्याला सामनावीर म्हणूनही निवडण्यात आले. या सामन्यात पूरनने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. त्याने 250 च्या स्ट्राईक रेटने 26 चेंडूत 65 धावांची तुफानी खेळी करत सामना एकतर्फी केला. यादरम्यान त्याने अनेक चौकार आणि षटकारही मारले.

प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 176 धावा केल्या. त्याचा पाठलाग करण्यासाठी आलेले वेस्ट इंडिजचे सलामीवीर ॲलिक अथनासे आणि शे होप यांनी अवघ्या 8 षटकांत 84 धावा केल्या. 30 चेंडूत 40 धावा करून अथनाजे बाद झाला, तेव्हा संघाला विजयासाठी 12 षटकात 93 धावा करायच्या होत्या. यानंतर यष्टिरक्षक फलंदाज निकोलस पूरन फलंदाजीला आला आणि त्याने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. तो येताच त्याने षटकारांचा वर्षाव सुरू केला आणि अवघ्या 26 चेंडूत 65 धावा केल्या. पुरनने या स्फोटक खेळीत 7 षटकार आणि 2 चौकार लगावले. यासह तो वेस्ट इंडिजसाठी सर्वाधिक चौकार मारणारा फलंदाज बनला.


65 धावांच्या या डावात पूरणने चौकारावर 56 धावा केल्या. त्याने दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज नांद्रे बर्गरच्या एका षटकात सलग 4 षटकारही ठोकले. पुरनच्या या दहशतीला एडन मार्करामची टीम बळी पडली. तर शे होपने 36 चेंडूत 51 धावांची खेळी केली. अशाप्रकारे वेस्ट इंडिजने 13 चेंडू शिल्लक असताना 7 विकेटने सामना जिंकला.

या सामन्यात सुरुवातीपासूनच वेस्ट इंडिजचा दबदबा दिसत होता. कर्णधार रोव्हमन पॉवेलने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली. प्रथम फलंदाजीला आलेल्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवात चांगली झाली नाही. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी पॉवरप्लेमध्येच 4 बळी घेत खळबळ उडवून दिली. 8 षटकांत 42 धावांवर अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता. मात्र, यानंतर ट्रिस्टियन स्टब्स आणि पॅट्रिक क्रुगर यांनी डावाची धुरा सांभाळली. स्टब्सने 42 चेंडूत 76 धावा केल्या, तर क्रुगरने 32 चेंडूत 44 धावा केल्या. अशाप्रकारे दक्षिण आफ्रिकेला 176 धावा करता आल्या, पण पुरनच्या झंझावातासमोर ही धावसंख्या कमी पडली.