रिकी पाँटिंगच्या या दाव्यामुळे अपूर्णच राहणार सचिनचे स्वप्न, रोहित-विराट करू शकणार नाहीत हे मोठे काम


सचिन तेंडुलकरने आपल्या 24 वर्षांच्या कारकिर्दीत अनेक विक्रम केले. सर्वाधिक शतके असोत किंवा धावा असो, त्याने क्रिकेटमधील जवळपास सर्व विक्रम आपल्या नावावर केले. त्याने 463 एकदिवसीय सामन्यांमध्ये 18426 धावा केल्या, तर 200 कसोटी सामन्यांमध्ये 15921 धावा केल्या. या दोन्ही फॉरमॅटमध्ये त्याने एकूण 100 शतके आणि 164 अर्धशतके केली आहेत. याशिवाय त्याने आपल्या कारकिर्दीत अनेक महान चमत्कार केले. मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान सचिनने आपली इच्छा व्यक्त केली होती की त्याचे हे विक्रम कोणत्याही भारतीयाने, विशेषतः विराट कोहली किंवा रोहित शर्माने मोडावेत. मात्र, रिकी पाँटिंगचे मत वेगळे आहे. नुकताच त्याने एक मोठा दावा केला असून तो खरा ठरला, तर सचिनचे स्वप्न अधुरेच राहणार आहे.

विराट कोहलीने याआधी वनडेमध्ये 50 शतके झळकावली आहेत. 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान, त्याने सचिन तेंडुलकरचा 49 एकदिवसीय शतकांचा विक्रम मोडला. त्यावेळी ‘लिटिल मास्टर’ही तेथे उपस्थित होता आणि त्याने विराटसाठी टाळ्या वाजवल्या. पण कसोटी सामन्यांमध्ये तो सचिनच्या जवळपास कुठेच दिसत नाही. दुसरीकडे, इंग्लंडचा फलंदाज जो रूट या फॉरमॅटमध्ये झपाट्याने शतके आणि धावा करत आहे. हे लक्षात घेऊन रिकी पाँटिंगने दावा केला आहे की, तो कसोटीत सचिनपेक्षा जास्त धावा करू शकतो. मात्र, यासाठी त्याला त्याचा सध्याचा फॉर्म आणि पुढील 4 वर्षे धावांची भूक कायम ठेवावी लागणार आहे.

जो रूट सध्या 33 वर्षांचा आहे. त्याने 143 कसोटी सामन्यांच्या 261 डावांमध्ये 50.11 च्या सरासरीने 12 हजारहून अधिक धावा केल्या आहेत. यामध्ये 32 शतकांचाही समावेश आहे. आता तो सचिनच्या विक्रमापासून 4 हजार धावा दूर आहे. दुसरीकडे, विराट 34 वर्षांचा आहे आणि त्याने आतापर्यंत कसोटीत 113 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 8848 धावा केल्या आहेत. सचिनशी बरोबरी साधण्यासाठी त्याला जवळपास 7 हजार धावा कराव्या लागतील. याशिवाय 37 वर्षीय रोहित शर्मा 59 कसोटी सामन्यांमध्ये केवळ 4137 धावा करू शकला आहे. ही आकडेवारी पाहता तीन फलंदाजांमध्ये जो रूट सचिनच्या सर्वात जवळ असल्याचे स्पष्ट होते. अशा परिस्थितीत रिकी पाँटिंगचे म्हणणे खरे ठरताना दिसत आहे. असे झाले तर सचिनचे स्वप्न अपूर्णच राहणार आहे.