भारतात येणार पाकिस्तान क्रिकेट संघ, 2025च्या टूर्नामेंटबाबत मोठा निर्णय


चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे आयोजन पाकिस्तानला करायचे आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानचा दौरा करणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या सगळ्या दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तान क्रिकेट संघ पुढील वर्षी भारत दौऱ्यावर येऊ शकतो. आशिया कप 2025 चे यजमानपद हे त्यामागचे कारण आहे.

वृत्तानुसार, भारत 2025 पुरुषांच्या आशिया कपचे यजमानपद भूषवणार आहे. ही स्पर्धा 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळवली जाईल. ज्यामध्ये 6 संघ सहभागी होणार आहेत. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि सहावा संघ पात्रता फेरीद्वारे निश्चित होईल. अशा स्थितीत पाकिस्तानला पुढील वर्षी भारत दौऱ्यावर यावे लागणार आहे. 2023 आशिया कप पाकिस्तानच्या यजमानपदावर खेळला गेला होता. त्यावेळी टीम इंडिया पाकिस्तानला गेली नव्हती, त्यामुळे ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलवर आयोजित करण्यात आली होती.

आशिया क्रिकेट परिषदेने जारी केलेल्या IEOI दस्तऐवजानुसार, भारत 2025 मध्ये पुरुषांच्या आशिया कपचे यजमानपद भूषवणार आहे, जो T20 फॉरमॅटमध्ये खेळला जाईल. त्याच वेळी, 2027 आशिया कपचे यजमानपद बांगलादेशकडे असेल. 2027 आशिया चषक केवळ एकदिवसीय फॉर्मेटमध्येच होणार आहे. या दोन्ही आवृत्त्यांमध्ये 13-13 सामने खेळवले जातील. या दस्तऐवजात असेही म्हटले आहे की, वेळापत्रक, तारीख, स्वरूप आणि ठिकाणासह ही सर्व माहिती आशिया क्रिकेट परिषद बदलू शकते.

आशिया कप 1984 मध्ये सुरु झाला होता. या स्पर्धेच्या आतापर्यंत 16 आवृत्त्या खेळल्या गेल्या आहेत. मात्र भारताने आशिया चषक फक्त एकदाच आयोजित केला आहे. भारताने 1990/91 आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद भूषवले होते, तेव्हा भारताने ही स्पर्धा जिंकली होती. अशा परिस्थितीत 2025 आशिया कप खूप खास असणार आहे. ही स्पर्धा 34 वर्षांनंतर भारतात खेळवली जाणार आहे.

टीम इंडिया हा या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आहे. भारताने आतापर्यंत 8 वेळा आशिया कप जिंकला आहे. त्याचबरोबर या यादीत श्रीलंका 6 विजेतेपदांसह दुसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तानचा संघ केवळ दोनदाच आशिया चषकाचा चॅम्पियन बनू शकला आहे. शेवटचा आशिया चषकही भारताच्या नावावर होता. जिथे टीम इंडियाने फायनलमध्ये श्रीलंकेचा पराभव केला होता.