Nestle Q1 Results : मॅगीची निर्मिती करणाऱ्या कंपनीची आश्चर्यकारक कामगिरी, दररोज कमावले 53 कोटी रुपये


भारतातील लोकांना मॅगी नूडल्स खूप आवडतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच मॅगीचे वेड आहे, त्यामुळेच देशात मॅगीची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते. नेस्ले या कंपनीसाठी भारत ही जगातील सर्वात मोठी बाजारपेठ बनली आहे. कंपनी भारतात मॅगीची विक्री करून बंपर कमाई करत आहे.

खरं तर, मॅगी उत्पादक कंपनी नेस्ले इंडियाने नुकतेच आर्थिक वर्ष 2024-25 च्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. Q1 च्या निकालांमध्ये, कंपनीचा नफा वार्षिक 7 टक्क्यांनी वाढून 746 कोटी रुपये झाला आहे. त्याचवेळी, वर्षभरापूर्वी याच तिमाहीत कंपनीला 698 कोटी रुपयांचा नफा झाला होता. मॅगीच्या विक्रीतून कंपनीने दररोज 53 कोटी रुपये कमावले आहेत.

नेस्ले इंडियाच्या ऑपरेशन्समधील महसुलात वार्षिक आधारावर 3.33% वाढ नोंदवली गेली आहे. आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या तिमाहीत कामकाजातून महसूल 4,813.95 कोटी रुपये होता. एका वर्षापूर्वी याच तिमाहीत म्हणजेच आर्थिक वर्ष 2024 च्या पहिल्या तिमाहीत महसूल 4,658.53 कोटी रुपये होता.

पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून 2025) कंपनीचे एकूण उत्पन्न वार्षिक आधारावर (YoY) 3.65% वाढीसह 4,853 कोटी रुपये होते, जे मागील वर्षी याच तिमाहीत 4,682 कोटी रुपये होते. त्याच वेळी, तिमाही आधारावर कंपनीच्या एकूण उत्पन्नात 8.33% ने घट झाली आहे, नेस्लेचे शेअर्स 2.50% कमी झाले आहेत आणि 2,477 रुपयांवर बंद झाले आहेत. गेल्या एका वर्षात स्टॉक फक्त 8.81% वाढला आहे.

नेस्ले इंडिया लिमिटेड ही बहुराष्ट्रीय कंपनी नेस्लेची भारतीय उपकंपनी आहे. 28 मार्च 1959 रोजी भारतात त्याची स्थापना झाली. याचे मुख्यालय हरियाणातील गुडगाव येथे आहे. कंपनी अन्न, पेये, चॉकलेट आणि मिठाई यांसारखी उत्पादने तयार करते. नेस्ले इंडियामध्ये मूळ कंपनी नेस्लेची 60% पेक्षा जास्त भागीदारी आहे. नेस्ले इंडियाच्या देशभरात 9 उत्पादन सुविधा आहेत.