
गेल्या 10 वर्षांपासून सलमान खानच्या ‘किक’ (किक 2) या चित्रपटाच्या सिक्वेलची वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. आता या चित्रपटाची प्रतीक्षा संपणार आहे. तो बनवण्याची तयारी निर्मात्यांनी केली आहे. सलमान पुन्हा एकदा देवीलाल सिंग म्हणजेच डेविलच्या रुपात मोठ्या पडद्यावर परतण्यासाठी सज्ज झाला आहे.
Kick 2 : येत आहे देसी ‘रॉबिन हूड’ डेविल, 10 वर्षांनंतर सलमान खानच्या किक 2 चे सर्वात मोठे अपडेट
मिड डेच्या वृत्तानुसार, दिग्दर्शक साजिद नाडियादवाला किक 2 मोठ्या पडद्यावर आणण्यासाठी उत्सुक आहेत. साजिद या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर खूप मेहनत घेत आहे आणि चित्रपटाची कथा लोकांच्या अपेक्षांवर खरी उतरावी, यासाठी तो प्रयत्नशील आहे. पुढील वर्षी या चित्रपटाचे शूटिंग सुरू करण्याचा साजिदचा प्रयत्न आहे.
साजिद चित्रपटाची स्क्रिप्ट लिहित असल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. यासोबतच त्याला चित्रपटाच्या वेळापत्रकाबाबतही मार्ग काढावा लागणार आहे, कारण सध्या त्याच्या प्रोडक्शन हाऊस बॅनरखाली अनेक चित्रपटांवर काम सुरू आहे. खरं तर, त्याला सर्व काम व्यवस्थित करायचे आहे, जेणेकरून तो किक 2 च्या दिग्दर्शनावर आपले पूर्ण लक्ष देऊ शकेल. वास्तविक, साजिद नाडियादवालाची प्रॉडक्शन कंपनी सलमानच्या सिकंदरचीही निर्मिती करत आहे.
साजिद नाडियादवाला आणि सलमान खान चांगले मित्र आहेत. सलमानच्या किकद्वारे साजिदने दिग्दर्शनाच्या जगात प्रवेश केला. मात्र, त्यानंतर त्याने कोणत्याही चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले नाही. आता तब्बल 10 वर्षांनंतर त्याने पुन्हा आपल्या पुढच्या चित्रपटाची तयारी सुरू केली आहे. साधारणपणे साजिद निर्माता म्हणून सक्रिय राहतो. पण त्याने अनेक चित्रपटांच्या पटकथाही लिहिल्या आहेत. त्यांनी हाऊसफुल, हाऊसफुल 2, हाउसफुल 4, बागी 2, बागी 3, हिरोपंती, बच्चन पांडे आणि किसी का भाई किसी की जान यासारखे चित्रपट लिहिले आहेत.
सुमारे 10 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या किकमध्ये सलमान खानची देसी रॉबिन हूड स्टाइल चाहत्यांना आवडली होती. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी नकारात्मक भूमिकेत होता, मात्र चित्रपटातील त्याचा अभिनय लोकांना आवडला होता. विशेषतः त्याची हसण्याची पद्धत व्हायरल झाली होती. याशिवाय या चित्रपटात जॅकलीन फर्नांडिस मुख्य भूमिकेत आणि रणदीप हुड्डा पोलीस कर्मचाऱ्याच्या भूमिकेत दिसला होता. तुम्हाला माहीत नसेल, पण 2014 चा किक त्याच नावाच्या तेलुगु चित्रपटाचे हिंदी रूपांतर होते.
किक हा सलमान खानच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत आहे. हा चित्रपट बनवण्यासाठी निर्मात्यांनी सुमारे 100 कोटी रुपये खर्च केले होते, परंतु चित्रपटाने बंपर कमाई केली आणि निर्मात्यांना श्रीमंत केले. या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 231.85 कोटींची कमाई केली होती. याशिवाय या चित्रपटाने विदेशात 68 कोटींचा व्यवसाय केला होता. हा चित्रपट 25 जुलै 2014 रोजी मोठ्या पडद्यावर आला.
सलमानच्या किसी का भाई किसी की जानला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला नाही. अशा परिस्थितीत सलमान आता खूप विचार करून त्याचा पुढचा प्रोजेक्ट निवडत आहे. सध्या सलमान खान एआर मुरुगादास दिग्दर्शित सिकंदरमध्ये काम करत आहे. या चित्रपटात सलमान पहिल्यांदाच रश्मिका मंदान्नासोबत झळकणार आहे.
