प्रत्येकाला अशा कंपनीत काम करायचे असते, जिथे त्याला सर्व प्रकारच्या सुविधा आणि योग्य पगार मिळतो आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बॉस चांगला असला पाहिजे, कारण बॉस चांगला नसेल, तर ऑफिसचे वातावरण खराब होते आणि अशा परिस्थितीत, कर्मचाऱ्यांना तेथे काम करणे कठीण होते. बॉस आणि कर्मचारी यांच्यातील वाद किंवा मारामारीशी संबंधित किस्से सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल झाले आहेत. सध्या चीनमध्ये याशी संबंधित एक अनोखा ट्रेंड सुरू आहे, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
चीनमध्ये अनोखी विक्री, येथे जुन्या वस्तूंप्रमाणे विकले जात आहेत मॅनेजर आणि कार्यालयातील कर्मचारी
खरं तर, येथील तरुण कर्मचाऱ्यांनी त्यांचे बॉस, सहकारी आणि अगदी नोकऱ्यांची विक्री ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर करणे सुरू केले आहे, जे सेकंड-हँड वस्तू विकतात आणि खरेदी करतात. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, लोक जियान्यु नावाच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर त्यांच्या नोकऱ्या आणि मॅनेजर विकत आहेत. हे प्लॅटफॉर्म चीनच्या प्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनी अलीबाबाचे आहे, जिथे सेकंड हँड उत्पादने विकली जातात आणि खरेदी केली जातात. चीनमधील लोक हे काम करत आहेत, जेणेकरून ते त्यांच्या नोकरीदरम्यान कामाचा ताण कमी करू शकतील आणि तणावमुक्त राहतील.
‘त्रासदायक बॉस’, ‘निरुपयोगी नोकरी’ आणि ‘घृणास्पद सहकारी’ या संकेतस्थळावर सूचीबद्ध आहेत आणि त्यासाठी 4 ते 9 लाख रुपये किंमत ठेवण्यात आली आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, एका यूजरने सांगितले की, तो आपली नोकरी 90 हजार रुपयांना विकत आहे. तो म्हणतो की या नोकरीमध्ये त्याला दरमहा 30 हजार रुपये मिळतात आणि खरेदीदारांना त्यांच्या गुंतवणूकीची रक्कम तीन महिन्यांत परत मिळू शकते. त्याने असेही सांगितले की त्याने ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर आपली नोकरी सूचीबद्ध केली आहे, कारण त्याला सकाळी लवकर उठायचे नाही.
त्याचप्रमाणे, आणखी एका वापरकर्त्याने त्याच्या सहकाऱ्याला जियान्युवर 45 हजार रुपयांना विक्रीसाठी सूचीबद्ध केले आहे. नोकरीमुळे येणारा ताण दूर करण्याचा हा अनोखा आणि मजेदार मार्ग चीनमध्ये खूप चर्चिला जातो.