Video : विश्वविक्रमादरम्यान घेतला एक करिष्माई झेल, संघाला पराभवापासून वाचवण्यासाठी त्याने प्राण पणाला लावला


सूर्यकुमार यादवच्या एका झेलने टीम इंडियाला 2024 च्या टी20 विश्वचषकात चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाचे योगदान दिले होते. आता असेच काहीसे इंग्लंडच्या कौंटी क्रिकेटमध्ये पाहायला मिळाले आहे. कौंटी क्रिकेटमध्ये, चेल्तेनहॅमच्या कॉलेज ग्राउंडवर ग्लॅमॉर्गन आणि ग्लॉस्टरशायर यांच्यात एक रोमांचक सामना खेळला गेला. काउंटी चॅम्पियनशिप विभाग दोनच्या या सामन्यात एका झेलने सामन्याचा निकाल निश्चित केला. हा कॅच करिष्माई कॅचपेक्षा कमी नव्हता.

हा काउंटी चॅम्पियनशिप सामना जिंकण्यासाठी ग्लॅमॉर्गनला चौथ्या डावात 593 धावा करायच्या होत्या. मात्र या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना ग्लॅमॉर्गन संघ 592 धावा करून सर्वबाद झाला. ग्लॅमॉर्गनने या लक्ष्याचा पाठलाग केला असता, तर काउंटी चॅम्पियनशिपच्या इतिहासातील हा सर्वात मोठा धावांचा पाठलाग ठरला असता. पण ग्लॅमॉर्गनला इतिहास रचण्यापासून रोखण्यासाठी ग्लॉस्टरशायरचा यष्टिरक्षक जेम्स ब्रेसीने करिष्माई झेल घेतला.

हा सामना जिंकण्यासाठी ग्लॅमॉर्गनला शेवटच्या षटकात 2 धावांची गरज होती. हे षटक ग्लॉस्टरशायरच्या वतीने अजितसिंग डेलेने टाकले. या षटकातील पहिल्या 5 चेंडूंवर ग्लॅमर्गनच्या फलंदाजांना केवळ 1 धावा करता आली. अशा स्थितीत सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर ग्लॅमॉर्गनला विजयासाठी 1 धावांची गरज होती आणि त्यांच्या हातात फक्त 1 विकेट होती. त्यानंतर फलंदाज जेमी मॅकइलरॉयने अजित सिंग डेलच्या शेवटच्या चेंडूवर सरळ मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू बॅटची कड घेऊन यष्टिरक्षक जेम्स ब्रेसीच्या दिशेने गेला. विशेष बाब म्हणजे ब्रेसीने हातावर ग्लोव्ह देखील घातले नव्हते, तरीही जेम्स ब्रेसीने हवेत उडी मारून एका हाताने चेंडू पकडला. त्याच्या शानदार झेलमुळे सामना अनिर्णित राहिला. अन्यथा सर्वात मोठ्या धावांचा पाठलाग करून ग्लॅमॉर्गन संघ इतिहास रचू शकला असता.


ग्लॅमॉर्गन संघ हा सामना जिंकण्यात अपयशी ठरला असला, तरी चौथ्या डावात 592 धावा करून मोठा विक्रम निश्चितच केला. याआधी काउंटी चॅम्पियनशिपमध्ये कोणत्याही संघाने चौथ्या डावात एवढी मोठी धावसंख्या उभारली नव्हती. काउंटी चॅम्पियनशिपचा हा नवा विक्रम आहे.