टीम इंडियाला 6 जुलैपासून झिम्बाब्वेविरुद्ध 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. या दौऱ्यासाठी बीसीसीआयने अलीकडेच 15 खेळाडूंचा संघ जाहीर केला होता, ज्यामध्ये शुभमन गिलकडे कर्णधारपद सोपवण्यात आले होते. व्हीव्हीएस लक्ष्मण यांना संघाचे प्रशिक्षक करण्यात आले. मंगळवारी बीसीसीआयने माहिती दिली की लक्ष्मणसोबत संघ या दौऱ्यासाठी रवाना झाला आहे. मात्र, आश्चर्यकारक बाब म्हणजे भारतीय संघ केवळ 10 खेळाडूंसोबत रवाना झाला आङे.
फक्त 10 खेळाडूंसह झिम्बाब्वेला रवाना झाली टीम इंडिया, 5 खेळाडू हॉटेलमध्ये ‘लॉक’
टीम इंडियाचे प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण झिम्बाब्वे दौऱ्यावर केवळ 10 खेळाडूंसह रवाना झाले आहेत. अशा स्थितीत असे का झाले आणि बाकीचे खेळाडू कुठे राहिले हा सर्वात मोठा प्रश्न आहे. वास्तविक, या दौऱ्यासाठी घोषित 15 खेळाडूंपैकी 5 टी-20 विश्वचषकासाठी वेस्ट इंडिजला गेले होते. अंतिम सामन्यानंतर हे सर्व खेळाडू सध्या वादळामुळे बार्बाडोसमध्ये अडकून पडले आहेत.
नितीश रेड्डी याच्या जागी आलेला शिवम दुबे टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनचा एक भाग होता. त्याच्याशिवाय संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल आणि राखीव खेळाडू रिंकू सिंग आणि खलील अहमद हे देखील वेस्ट इंडिजमध्ये आहेत. बेरील चक्रीवादळामुळे सर्व विमानतळ बंद असल्याने त्यांना तिथेच थांबावे लागले. वादळामुळे कोणत्याही खेळाडूला हॉटेलमधून बाहेर पडण्याची परवानगी नव्हती. ताज्या वृत्तानुसार, वर्ल्ड कपसाठी वेस्ट इंडिजला गेलेले सर्व खेळाडू बुधवारपर्यंत भारतात परत येऊ शकतात.
बार्बाडोसमध्ये अडकलेल्या सर्व खेळाडूंना बाहेर काढण्याचा बीसीसीआयचा पहिला प्रयत्न आहे. यासाठी एका विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली असून, ती त्यांना 3 जुलैपर्यंत दिल्लीत आणेल. मात्र, झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणारे 5 खेळाडू आधी दिल्लीत येणार की बार्बाडोसहून थेट झिम्बाब्वेला रवाना होणार हे अद्याप बीसीसीआयने स्पष्ट केलेले नाही. झिम्बाब्वेविरुद्धचा पहिला सामना 6 जुलै रोजी आहे, त्यामुळे त्यांना यादरम्यान 2 दिवसांची संधी असेल.
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया
शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिषेक शर्मा, ऋतुराज गायकवाड, रिंकू सिंग, संजू सॅमसन, ध्रुव जुरेल, शिवम दुबे, रायन पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार आणि तुषार देशपांडे.
भारत-झिम्बाब्वे मालिकेचे वेळापत्रक
झिम्बाब्वे दौऱ्यावर भारतीय संघ पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. सर्व सामने हरारे स्पोर्ट्स क्लब येथे होणार आहेत. हे सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 4.30 वाजता सुरू होतील.
- पहिला सामना- 6 जुलै
- दुसरा सामना- 7 जुलै
- तिसरा सामना- 10 जुलै
- चौथा सामना – 13 जुलै
- पाचवा सामना- 14 जुलै