
टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात डेव्हिड मिलरचा अप्रतिम झेल घेऊन सूर्यकुमार यादव भारतीय चाहत्यांचा हिरो बनला. तो झेल घेताच वर्ल्डकप ट्रॉफी टीम इंडियाच्या हातात आली होती. आज त्याच्यामुळेच खेळाडूंसह सर्व भारतीय चाहते 11 वर्षांनंतर आयसीसी ट्रॉफीचा विजय साजरा करू शकले आहेत. एकीकडे टीम इंडियाचे खेळाडू ट्रॉफी पकडून तिचे चुंबन घेत आहेत, छातीशी घेऊन मिठी मारत आहेत, तर दुसरीकडे सूर्यकुमार यादवने यासंदर्भात एक खास योजना तयार केली आहे. त्याने सांगितले की, भारतात परतल्यानंतर तो आपल्या शरीरावर ही ट्रॉफी गोंदवून घेईल. या ट्रॉफीचा त्याच्या बहिणीशी विशेष संबंध असल्याचेही त्याने उघड केले.
विश्वचषक ट्रॉफी आणि सूर्यकुमार यादवची बहीण यांच्यात आहे एक स्पेशल कनेक्शन, हृदयाजवळ गोंदवणार खास टॅटू
सूर्यकुमार यादव टी-20 विश्वचषक ट्रॉफी जिंकल्यानंतर सध्या बार्बाडोसमध्ये आहे. त्याने खुलासा केला आहे की 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान त्याने ट्रॉफीचा टॅटू काढण्याची योजना आखली होती, परंतु ते स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. आता जर त्याला पुन्हा संधी मिळाली, तर तो भारतात येताच हा ट्रॉफी त्याच्या हृदयाजवळ टॅटू गोंदवून घेईल. सूर्याने ट्रॉफीशी त्याच्या बहिणीचा संबंधही उघड केला. त्याने सांगितले की T20 वर्ल्ड कप फायनल आणि त्याच्या बहिणीचा वाढदिवस एकाच दिवशी होता. त्यामुळे ही ट्रॉफी त्याच्यासाठी खूप खास आहे आणि या ट्रॉफीसोबतच त्याला त्याच्या विजयाच्या तारखेचा टॅटूही दिसणार आहे.
टी-20 विश्वचषक 2024 च्या फायनलमध्ये भारताच्या ऐतिहासिक विजयात सूर्यकुमार यादवचा मोठा वाटा होता. शेवटच्या षटकात डेव्हिड मिलरने पांड्याच्या फुल टॉस बॉलवर जोरदार शॉट खेळला. चेंडू सीमारेषा ओलांडणार असे वाटत होते, त्याचदरम्यान सूर्यकुमार यादवने करिष्माई झेल घेत सर्वांनाच चकित केले. प्रचंड दडपणाखाली त्याने आपले झेल पकडण्याचे कौशल्य दाखवून दिले.
सूर्याने चेंडू पकडल्यानंतर सीमारेषा ओलांडली होती, पण त्याआधी त्याने चेंडू हवेत फेकला होता, नंतर माघारी येऊन चेंडू पकडला. त्यामुळे सामन्याचा कल पूर्णपणे टीम इंडियाच्या बाजूने बदलला. अखेर हा सामना भारतीय संघाने जिंकून ट्रॉफीवर नाव कोरले. एवढेच नाही, तर सूर्याने या स्पर्धेतही शानदार कामगिरी केली. त्याने आठ डावात 28.42 च्या सरासरीने दोन अर्धशतकांसह 199 धावा केल्या. या काळात त्याचा स्ट्राइक रेट 135 होता.
