T20 World Cup : इंझमाम-उल-हकने टीम इंडियावर केले बेईमानीचे आरोप केला, पाकिस्तानच्या टीव्ही चॅनलवर गायले हे रडगाणे


पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटर इंझमाम-उल-हकने टीम इंडियावर गंभीर आरोप केले आहेत. रोहित शर्मा आणि कंपनीवर 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये बेईमानी केल्याचा आरोप त्याने केला आहे. इंझमामने पाकिस्तानच्या टीव्ही चॅनलवर बसून हा आरोप केला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने चेंडूशी छेडछाड केल्याचे त्याने सांगितले. इंझमामच्या या बोलण्यावर शोमध्ये बसलेले दुसरे पाहुणे आणि देशाचे आणखी एक दिग्गज क्रिकेटर सलीम मलिक यांनीही होकार दिल्याचे दिसले.

इंझमाम उल हक आणि सलीम मलिक यांच्या बोलण्यातून हे स्पष्ट झाले आहे की 2024 च्या टी-20 विश्वचषकातील भारताचे यश त्यांना सहन होत नाही. त्यांचा विश्वासच बसत नाही की भारत ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला कसा हरवू शकतो? भारतीय संघाच्या ताकदीवर विश्वास कसा ठेवायचा? त्यांचाच संघ स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातून आधीच बाहेर पडला आहे. बरं, मोठा प्रश्न असा आहे की इंझमाम आणि सलीम मलिक यांनी टीम इंडियावर बॉल टॅम्परिंगचा मोठा आरोप कशाच्या आधारावर केला?

इंझमाम उल हक आणि सलीम मलिक पाकिस्तानच्या स्पोर्ट्स 24 वृत्तवाहिनीच्या शोमध्ये बसून टीम इंडियावर बेईमानी केल्याचा आरोप करताना दिसले. इंझमाम उल हकने ऑस्ट्रेलियाच्या डावात भारतीय गोलंदाज अर्शदीप सिंगच्या रिव्हर्स स्विंगवर आक्षेप घेतला. हे 15 व्या षटकात घडले. इंझमामच्या म्हणण्यानुसार, जेव्हा त्याने हे पाहिले तेव्हा तो आश्चर्यचकित झाला. त्याने शोमध्ये सांगितले की याचा अर्थ 12व्या, 13व्या षटकापर्यंत चेंडू उलटायला तयार होता. टीम इंडियाने चेंडूशी छेडछाड केली की नाही हे पंचांनी तपासावे, असे हक म्हणाला.

शोमध्ये सलीम मलिकही इंझमामच्या म्हणण्याशी सहमत होताना दिसला. सलीम मलिक म्हणाला की, तपासण्यासारख्या गोष्टी फक्त आमच्या संघांसाठी आहेत. भारत आणि काही संघांना यातून सूट देण्यात आली आहे. मलिकचे शब्द पुढे करत इंझमाम म्हणाला की आमच्या संघातील कोणत्याही खेळाडूने हे केले असते, तर हा मुद्दा बनला असता.