फटकारल्यानंतर संजीव गोयंका यांनी केएल राहुलला दिली डिनर पार्टी, मिठी देखील मारली


आता केएल राहुल आणि संजीव गोयंका यांच्यात सर्व काही ठीक आहे. जे ताजे फोटो समोर आले आहे, ते पाहिल्यावर किमान असेच वाटते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोमुळे एलएसजीचे मालक आणि कर्णधार यांच्यातील दुरावा कमी होत आहे. या फोटोतील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे गोयंका आणि राहुल मिठी मारताना दिसत आहेत. लखनौ सुपर जायंट्सचा पुढील सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार आहे. सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत असलेला हा फोटो या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी एलएसजीचा कर्णधार केएल राहुलचा ताण कमी करणार आहे.

एक्स-हँडलवर शेअर केलेल्या छायाचित्रात संजीव गोयंका स्पष्टपणे केएल राहुलला मिठी मारताना दिसत आहेत. एलएसजी फ्रँचायझीच्या मालकाने कॅप्टन राहुलला त्याच्या घरी जेवायला बोलावले, तेव्हा हा प्रकार घडला. फोटो असे दाखवतात की केएल राहुल घरी पोहोचताच, संजीव गोयंका यांनी त्याचे स्वागत मिठी मारुन केले.

सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यानंतर लखनौ सुपर जायंट्समध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. हे केवळ त्या सामन्यात संघाचा झालेल्या दणदणीत पराभवामुळे झाले नाही. पण त्यानंतर संजीव गोएंका आणि केएल राहुल यांच्यात जे काही घडले त्यामुळे. सनरायझर्सविरुद्धच्या मोठ्या पराभवानंतर संजीव गोएंका केएल राहुलला मैदानावरच फटकारताना दिसले होते.

संजीव गोएंका आणि केएल राहुलच्या प्रकरणाला इतके महत्त्व प्राप्त झाले की त्यावर अनेक विधाने झाली. क्रिकेटशी निगडित काही लोकांनी केएल राहुल याच्याशी केलेल्या वागणुकीबद्दल थेट संजीव गोयंका यांना लक्ष्य केले. मात्र, या सर्व प्रकारानंतर आता जे फोटो समोर आले आहे, ते पाहता एलएसजीमध्ये पुन्हा सर्व काही सुरळीत झाल्याचे दिसते.