बांगलादेशने झिम्बाब्वेविरुद्धची टी20 मालिका संपताच टी-20 विश्वचषकासाठी संघ जाहीर केला आहे. संघात फारसे सरप्राईज पॅकेज दिसले नाहीत. बहुतेक चेहरे तेच आहेत, जे झिम्बाब्वेविरुद्ध खेळताना आणि कामगिरी करताना दिसले होते. संघाच्या कर्णधारपदाची धुरा 25 वर्षीय नजमुल हुसैन शांतोकडे सोपवण्यात आली आहे. स्टार अष्टपैलू शाकिब अल हसन हा संघातील सर्वात अनुभवी सदस्यांपैकी एक असेल.
25 वर्षीय कर्णधाराच्या भरवश्यावर बांगलादेश, T20 विश्वचषकासाठी संघाची निवड
बांगलादेशने या वर्षाच्या सुरुवातीला नजमुल शांतोला तिन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधार बनवले होते. शांतोच्या नेतृत्वाखाली बांगलादेशने झिम्बाब्वेविरुद्ध 5 सामन्यांची टी-20 मालिका 5-0 ने जिंकली. आता T20 विश्वचषक पुढे आहे, जिथे संपूर्ण बांगलादेश आपल्या नवीन कर्णधाराने संघाला विजयाकडे नेण्याची अपेक्षा करत आहे. T20 विश्वचषक 2024 ही शांतोसाठी देखील मोठी परीक्षा आहे, कारण बांगलादेशचे कर्णधारपद स्वीकारल्यानंतर ही त्याची पहिली आयसीसी स्पर्धा असेल.
झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-20 मालिकेतून शाकिब अल हसन जवळपास वर्षभरानंतर बांगलादेश संघात परतला. पुनरागमन करताना, त्याने झिम्बाब्वेविरुद्ध 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना खेळला आणि 4 विकेट घेतल्या. त्या कामगिरीने शाकिबचे संघातील स्थान निश्चित झाले.
शाकिबशिवाय वेगवान गोलंदाज तन्झिम हसननेही झिम्बाब्वेविरुद्ध 2 सामने खेळून संघात आपले स्थान पक्के केले. याशिवाय निवडकर्त्यांनी डावखुरा वेगवान गोलंदाज शरीफुल इस्लामचाही संघात समावेश केला आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या शेवटच्या दोन टी-20 सामन्यांतून शरीफुलला विश्रांती देण्यात आली होती.
बांगलादेशला T20 विश्वचषक 2024 च्या गट ड मध्ये ठेवण्यात आले आहे. या गटात बांगलादेशशिवाय दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, नेदरलँड आणि नेपाळचे संघ आहेत. 2 जूनपासून सुरू होणाऱ्या आयसीसीच्या या मेगा स्पर्धेत बांगलादेशचा पहिला सामना 7 जूनला होणार आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या भूमीवर 2024 टी-20 विश्वचषक स्पर्धा होणार आहे.