Google Play Store : सरकारी ॲप्सवर दिसणार ‘सरकारी बॅज’, ज्यामुळे होईल फसवणूक थांबवण्यास मदत


भारतात ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. या ऑनलाइन फसवणुकीत ॲप्सचा मोठा वाटा आहे. यामुळे गुगलने भारतात एक नवीन पुढाकार घेतला आहे. यामध्ये गुगलने सरकारी ॲप्ससाठी एक बॅज आणला आहे, जो आतापासून सरकारी ॲप्सवर त्यांना ओळखण्यासाठी दिसेल.

खरं तर, ॲप्सद्वारे फसवणूक टाळण्यासाठी Google वेळोवेळी पावले उचलत आहे. ज्यामध्ये गुगल आपल्या प्ले स्टोअरवरून फेक ॲप्स डिलीट करते. अशा परिस्थितीत सरकारी ॲप्ससाठी बॅज लाँच करणे हा गुगलचा एक मोठा उपक्रम आहे, ज्याद्वारे गुगलला ॲप्सद्वारे होणारी सायबर फसवणूक थांबवायची आहे.

अनेक वेळा गुगल प्ले स्टोअरवरून बनावट ॲप्स डाऊनलोड करून युजर्स फसवणुकीला बळी पडतात. अशा परिस्थितीत गुगलने अशी फसवणूक रोखण्यासाठी अधिकृत सरकारी ॲप्स ओळखण्यासाठी विशेष व्यवस्था केली आहे. आता Play Store वर सरकारी ॲप्ससमोर सरकार नावाचा बॅज दिसेल, ज्यामुळे यूजर्स ॲप ओळखू शकतील. कंपनीच्या म्हणण्यानुसार, भारत, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जर्मनी, फ्रान्स, इंडोनेशिया, मेक्सिको यासारख्या देशांतील 2000 ॲप्सचा या नवीन सरकारी बॅज अंतर्गत समावेश करण्यात आला आहे.

भारतातही व्होटर हेल्पलाइन, डिजीलॉकर, MAadhaar, eParivahan सारखी ॲप्स या बॅजखाली दिसतील. यासोबतच आता गुगल प्ले स्टोअरवर एकाच वेळी दोन ॲप डाऊनलोड करता येणार आहेत. यापूर्वी एका वेळी एकच ॲप डाउनलोड करता येत होते.

दुसरे ॲप डाउनलोड करताना पूर्वीचे ॲप वेटिंग मोडमध्ये जात असे. एकाच वेळी दोन ॲप डाउनलोड करण्याची सुविधा बहुतांश स्मार्टफोनमध्ये सुरू झाली आहे. ॲपल ॲप स्टोअरमध्ये वापरकर्ते एकाच वेळी तीन ॲप डाउनलोड करू शकतात.