IPL 2024 : विराट-गावस्करच्या वादात वसीम अक्रमची उडी, कोहलीसाठी म्हणाला मोठी गोष्ट


विराट कोहली आणि सुनील गावस्कर, ही दोन नावे भारतीय क्रिकेटमध्ये मोठ्या आदराने घेतली जातात. दोघेही दिग्गज खेळाडू आहेत, पण हे देखील खरे आहे की त्यांच्या नात्यात अनेकदा तणाव दिसून येतो. अलीकडेच गावस्कर आणि विराट यांच्यात आणखी एक वाद निर्माण झाला असून त्यात आता पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रमनेही उडी घेतली आहे. वसीम अक्रमने विराट कोहलीला असे बोलू नये, असा सल्ला दिला आहे. फलंदाजाची ताकद आणि कमकुवतपणा सांगणे हे समालोचकांचे काम आहे, असे म्हणत अक्रमने गावस्करांचे समर्थन केले.

वसीम अक्रम एका मुलाखतीत म्हणाला, विराट आणि गावस्कर दोघेही महान खेळाडू आहेत. मी सुनील गावस्कर यांना क्रिकेटर, माणूस आणि मैदानाबाहेरही ओळखतो. वर्षानुवर्षे ते समालोचन करत आहेत. तर विराट कोहली हा अव्वल खेळाडू आहे. त्याने खूप धावा केल्या आहेत, पण त्याने असे बोलू नये. खरंतर सुनील गावस्कर यांनी विराट कोहलीच्या स्ट्राईक रेटवर प्रश्न उपस्थित केला होता. यानंतर विराटने पुढच्या डावात शानदार फलंदाजी करत त्याच्यावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या समालोचकांना उत्तरे दिली. यानंतर सुनील गावस्कर संतापले आणि लाइव्ह शोमध्ये त्यांनी विराटचे हे वक्तव्य वारंवार वाजवणाऱ्या आयपीएल प्रसारण वाहिनीला फटकारले. गावस्कर यांचा असा विश्वास होता की विराटच्या वक्तव्यामुळे चॅनल स्वतःच्या समालोचकांना बदनाम करत आहे.

विराट कोहलीने या मोसमात 11 सामन्यात 542 धावा केल्या आहेत. स्वत:च्या डोक्यावर ऑरेंज कॅप सजवली आहे. विराटची सरासरी 67.75 आहे आणि मोठी गोष्ट म्हणजे त्याचा स्ट्राइक रेट 150 च्या आसपास आहे. 2016 नंतर प्रथमच विराटचा स्ट्राईक रेट 150 च्या जवळ आहे. याचाच अर्थ विराट कोहलीने या मोसमात धावांचा वेग वाढवला आहे. आता एवढे करूनही जर त्याच्या फलंदाजीवर प्रश्न उपस्थित झाले, तर त्याची प्रतिक्रिया नक्कीच येईल आणि मग विराट काही गप्प बसणाऱ्यातला नक्कीच नाही.