अक्षय कुमार आणि अर्शद वारसीचा जॉली LLB 3 अडचणीत, शूटिंग थांबवण्याची मागणी करणारी याचिका कोर्टात दाखल


अक्षय कुमार आणि अर्शद वारसीचा बहुप्रतिक्षित चित्रपट जॉली एलएलबीच्या तिसऱ्या भागाचे शूटिंग सुरू झाले असून अलीकडेच अक्षयने स्वतः सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून शूटिंग सुरू झाल्याची माहिती दिली होती. मात्र शूटिंग सुरू होताच हा चित्रपट अडचणीत सापडला आहे. या चित्रपटाविरोधात अजमेर येथील न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

अजमेर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रभान सिंह राठोड यांनी दिवाणी न्यायाधीश अजमेर उत्तर यांच्या न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, हा चित्रपट न्यायालयीन प्रतिष्ठेला कलंकित करतो. चित्रपटाचे अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक यांच्याविरोधात ही तक्रार करण्यात आली आहे. NBT च्या रिपोर्टनुसार, आजच या खटल्याची सुनावणी होऊ शकते.

जॉली एलएलबी 3 च्या शूटिंगवर बंदी घालावी, अशी मागणी चंद्रभान सिंह यांनी आपल्या याचिकेत केली आहे. ते म्हणतात की, आलेल्या पहिल्या दोन चित्रपटांनी न्यायालयीन प्रक्रियेची खिल्ली उडवली होती. या फ्रँचायझीच्या पहिल्या दोन चित्रपटांना लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे चंद्रभान सिंग सांगतात.

अजमेर आणि आजूबाजूच्या गावातील डीआरएम कार्यालयात या चित्रपटाचे शूटिंग सुरू असून ते पुढील काही दिवस सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ते म्हणतात की शूटिंगच्या वेळीही चित्रपटातील कलाकार न्यायव्यवस्था आणि न्यायमूर्तींच्या प्रतिष्ठेबाबत गंभीर दिसत नव्हते.

जॉली एलएलबी आणि जॉली एलएलबी 2 नंतर निर्माते त्याचा तिसरा भाग बनवत आहेत. पहिल्या भागात अर्शद वारसी आणि दुसऱ्या भागात अक्षय कुमार दिसला. आता दोन्ही जॉली तिसऱ्या भागात एकत्र दिसणार आहेत. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटात हुमा कुरेशी देखील दिसणार आहे, ती शूटिंगसाठी अजमेरला पोहोचली आहे.