IND vs PAK सामन्यावर दहशतवादी हल्ल्याचा धोका, T20 विश्वचषकापूर्वी पाकिस्तानकडून मिळाली धमकी


T20 विश्वचषक 2024 वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत 2 जूनपासून सुरू होत आहे, ज्यामध्ये सर्वात मोठा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात 9 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये होणार आहे. मात्र त्यापूर्वीच दहशतवादी हल्ल्याच्या धमकीने खळबळ उडाली आहे. कॅरेबियन मीडियाचा हवाला देत असे सांगण्यात आले आहे की, दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटने टी-20 वर्ल्ड कपसह जगभरातील मोठ्या कार्यक्रमांना लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे. ही धमकी IS च्या अफगाणिस्तान-पाकिस्तान शाखेने म्हणजेच IS-Khorasan ने दिली आहे. यानंतर क्रिकेट वेस्ट इंडिजने स्पर्धेसाठी मजबूत आणि कडेकोट सुरक्षेचे आश्वासन दिले आहे.

सुमारे महिनाभर चालणाऱ्या या विश्वचषक स्पर्धेत यावेळी भारतासह एकूण 20 संघ सहभागी होत आहेत. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा T20 विश्वचषक ठरणार आहे. तसेच अमेरिकेत प्रथमच या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असल्याने संपूर्ण जगाचे डोळे त्याकडे लागले आहेत. अशा स्थितीत स्पर्धेच्या सुरक्षेचे आव्हान निर्माण होणार असून आता या धोक्यामुळे स्पर्धेच्या सुरक्षेबाबत आयोजकांची चिंता वाढली आहे.

क्रिकबझने एका वृत्तात म्हटले आहे की, उत्तर पाकिस्तानमध्ये असलेल्या आयएस-खोरासानकडून विश्वचषकादरम्यान कॅरेबियन देशांना लक्ष्य करण्याची धमकी मिळाली आहे. या संदर्भात एक सुरक्षा अलर्ट जारी करण्यात आला आहे, ज्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की IS समर्थक प्रचार प्रसार माध्यम समूह नसीर-ए-पाकिस्तानने क्रीडा स्पर्धांमध्ये हिंसाचार पसरवण्यासाठी भडकाऊ व्हिडिओ जारी केले आहेत आणि अनेक देशांवर हल्ला करण्यासाठी चिथावणी दिली जात आहे.

याबाबत, क्रिकेट वेस्ट इंडिजचे सीईओ जॉनी ग्रेव्हज यांनी सांगितले की, बोर्ड सर्व यजमान देश आणि शहरांच्या अधिकाऱ्यांसह परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि कोणताही धोका ओळखून तो दूर करण्यासाठी ठोस योजना आखत आहेत. टी-20 विश्वचषकात सहभागी सर्व संघ आणि सर्व पक्षांची सुरक्षा ही त्यांची सर्वात मोठी प्राथमिकता आहे आणि त्यासाठी अचूक आराखडा तयार करण्यात आला आहे, असेही ते म्हणाले.

आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 6 कॅरेबियन देशांमध्ये होणार; हे अँटिग्वा आणि बार्बुडा, बार्बाडोस, गयाना, सेंट लुसिया, सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स आणि त्रिनिदाद आणि टोबॅगो येथे होणार आहे. याशिवाय प्रथमच अमेरिकेत क्रिकेट विश्वचषक आयोजित केला जात असून, त्यासाठी फ्लोरिडा, न्यूयॉर्क आणि टेक्सास राज्यांची निवड करण्यात आली आहे. टीम इंडिया ग्रुप स्टेजचे सामने न्यूयॉर्क आणि फ्लोरिडामध्ये खेळणार आहे. विश्वचषकाचा अंतिम सामना बार्बाडोस येथे होणार आहे.