ही महिला करते असे काम, दरमहा कमावते 5 लाखांहून अधिक, पण तिच्या जीवाला असतो कायम धोका


जगात अशा अनेक नोकऱ्या आहेत, ज्यामध्ये पगार खूप जास्त असतो, पण ते काम इतके धोकादायक असते की प्रत्येकजण ते करायला तयार नसतो. असेच एक काम म्हणजे समुद्राच्या खोलात जाऊन शोध घेणे. बोलायला खूप सोपे वाटते, पण प्रत्यक्षात त्यात इतका धोका आहे की, एक छोटीशी चूकही एखाद्याचा जीव घेऊ शकते. आता तुम्हीच विचार करा तुम्हाला असे काम करायला आवडेल का? कदाचित नाही, पण एक स्त्री आहे, जी हे धोकादायक काम करते आणि ते ती आनंदाने करते. हे काम करून दरमहा लाखो रुपये कमावत असल्याचे ती सांगते.

लार्किन बोहान असे या महिलेचे नाव आहे. ती 44 वर्षांची आहे. लार्किन म्हणते की ती जगातील सर्वात खोल महासागरांमध्ये काम करते. ती कशी भरपूर पैसा कमावते आणि आलिशान जीवन जगते, हे तिने उघड केले आहे. ती म्हणते की ती जे काम करते, ते करून तुम्हाला हवे असेल, तर तुम्ही 700 पौंड म्हणजेच सुमारे 73 हजार रुपये रोज कमवू शकता आणि राहण्याची आणि जेवणाची सर्व सोय मोफत होईल, पण त्याच वेळी ती सल्ला देते की तिचे काम अशक्त हृदय असणाऱ्यासाठी नाही.

लार्किन म्हणते की तिने सात समुद्राचा प्रवास केला आहे आणि गेल्या 12 वर्षांत कुप्रसिद्ध उत्तर समुद्र आणि अंगावर शहारे आणणाऱ्या मारियाना ट्रेंचला भेट दिली आहे, असे द सन या अहवालात म्हटले आहे. ज्याची खोली सुमारे 11 किलोमीटर आहे. तिला समुद्राच्या खोलात क्रेन आणि अवजड उपकरणांच्या साह्याने काम करावे लागत असल्याचे ती सांगते. अनेक वेळा तिला अशी अवजड उपकरणे घेऊन पाण्याखाली जावे लागते, त्यामुळे तिची प्रकृतीही बिघडते. म्हणूनच ती म्हणते की हे काम करण्यासाठी शरीर मजबूत असणे आवश्यक आहे.

लार्किन सांगते की तिच्या कामाच्या दरम्यान तिला फक्त मोफत निवास आणि जेवण मिळत नाही, तर याशिवाय ती दरवर्षी 60 हजार पौंड म्हणजेच 62 लाख रुपये कमवते आणि काही खलाशी दररोज 700 पौंड म्हणजे सुमारे 73 हजार रुपये कमावतात. ती तिच्या कामाबद्दल सांगते की एकदा ती समुद्राच्या आत गेली होती आणि 60 दिवस तिला जमीन दिसली नव्हती. मात्र, तिला कोणतीही अडचण आली नाही, कारण पंचतारांकित हॉटेल्स आणि मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसारख्या सुविधा मोठ्या जहाजांवर उपलब्ध असतात.