IPL 2024 : ‘अदब’ विसरून कोलकात्याने लखनौला ठेचले, KKR अव्वलस्थानी विराजमान


लखनौ सुपर जायंट्सला त्यांच्याच घरच्या मैदानावरील शेवटच्या सामन्यात मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. लखनौच्या एकना स्टेडियमवर रविवारी 5 मे रोजी संध्याकाळी झालेल्या या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने पुन्हा एकदा घरच्या संघाचा 98 धावांनी पराभव केला. यासह केकेआरने 16 गुणांसह गुणतालिकेत पहिले स्थान पटकावले आहे. पुन्हा एकदा, KKR च्या विजयाचा तारा अष्टपैलू सुनील नरेन होता, ज्याने प्रथम 81 धावांची स्फोटक खेळी खेळली आणि नंतर किफायतशीर गोलंदाजीसह विकेट देखील घेतली.

या मोसमात मोठी धावसंख्या सातत्याने पाहायला मिळाली, पण एकना स्टेडियम हे एकमेव मैदान होते, जिथे आजपर्यंत 200 चा आकडा एकदाही गाठला गेला नाही. कोलकाताच्या फलंदाजीनेही ही कामगिरी केली आणि आक्रमक फलंदाजी करत 235 धावांची जबरदस्त धावसंख्या उभारली. आता पंजाब किंग्जने कोलकाताविरुद्ध 262 धावांचे आव्हान देऊन इतिहास रचला असला, तरी यावेळी केकेआरच्या गोलंदाजांनी ती चूक केली नाही आणि लखनौने त्यांना तशी संधी दिली नाही.

पुन्हा एकदा फिल सॉल्ट आणि नरेन यांनी कोलकात्यासाठी स्फोटक सुरुवात केली आणि 4 षटकांत 50 धावा पूर्ण केल्या. पाचव्या षटकात फिल सॉल्ट बाद झाल्यानंतर नरेनचे आक्रमण सुरूच राहिले, ज्याने 27 चेंडूत हंगामातील तिसरे अर्धशतक पूर्ण केले आणि 12व्या षटकात बाद होण्यापूर्वी 39 चेंडूत 81 धावा केल्या होत्या. तसेच संघाला 140 धावांपर्यंत नेले होते.

आंद्रे रसेल, अंगक्रिश रघुवंशी आणि रिंकू सिंगला मोठी खेळी करता आली नाही, पण संघाला आधीच वेगवान सुरुवात मिळाली होती. यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि रमणदीप सिंग यांनी शेवटच्या षटकांमध्ये लहान पण जलद खेळी खेळून संघाला 235 धावांपर्यंत नेले. लखनौकडून नवीन उल हकने 3 बळी घेतले.

प्रत्युत्तरात लखनौ सुपर जायंट्सने वेगवान सुरुवात करण्याचा प्रयत्न केला, पण दुसऱ्याच षटकात रमणदीप सिंगने 21 मीटर धावत उत्कृष्ट झेल घेत अर्शीन कुलकर्णीला बाद केले. त्यानंतर राहुल आणि मार्कस स्टॉइनिस यांनी डावाची धुरा सांभाळत 50 धावांची जलद भागीदारी केली. एका सामन्याच्या बंदीनंतर संघात पुनरागमन करणारा वेगवान गोलंदाज हर्षित राणा (3/24) याने राहुल (25) याला बाद करून ही भागीदारी तोडली आणि येथूनच पडझड सुरू झाली.

आंद्रे रसेलने (2/17) लखनौला सर्वात मोठा धक्का दिला. फलंदाजीत अपयशी ठरलेल्या रसेलने सलग दोन षटकांत लखनौचे दोन बलाढ्य फलंदाज मार्कस स्टॉइनिस (36) आणि निकोलस पूरन (10) यांच्या विकेट घेतल्या. येथून लखनौचा पराभव निश्चित होता. यानंतर वरुण चक्रवर्ती (3/30), सुनिल नरेन (1/22) आणि हर्षित यांना उर्वरित फलंदाजांना बाद करण्यात फारसा वेळ लागला नाही आणि संपूर्ण संघ 16.1 षटकांत केवळ 137 धावांत गारद झाला.