भारतात सिग्नल तोडल्यास हजार रुपये दंड भरावा लागू शकतो. तसेच हेल्मेट न घातल्यासही दंड आकारण्यात येतो. पण वाहन अस्वच्छ असल्यास दंड भरावा लागतो, असे तुम्ही कधी ऐकले आहे का? खरं तर, दुबई, संयुक्त अरब अमिरातीमध्ये, जर एखाद्या व्यक्तीने सार्वजनिक पार्किंगमध्ये किंवा रस्त्यावर आपली घाणेरडी किंवा अस्वच्छ कार पार्क केली, तर त्याला 500 दिरहम म्हणजे सुमारे 11 हजार रुपये दंड भरावा लागतो. हा नियम दुबईमध्ये 2019 मध्ये आणण्यात आला होता.
आर्थिक दंडाचा अजब नियम! कारवर धूळ असल्यास आकारला जातो दंड
या समस्येला तोंड देण्यासाठी आता अनेक स्टार्टअप्स उदयास येत आहेत. दुबई हे खूप वर्दळीचे शहर आहे, इथल्या लोकांना रोज गाड्या धुवायला वेळ नाही. अशा स्थितीत येथे पाण्याविना गाडी धुण्याचा कल वाढला आहे. दुबईतील ‘अल नजम अल सती’ नावाचे कार वॉश स्टार्टअप 10-15 मिनिटांत कार धुते. ते पण फक्त 230-340 रुपयांमध्ये.
ते पाणी वापरत नाही, ज्यामुळे ते पर्यावरणास अनुकूल आहे. साफसफाईसाठी, स्टार्टअप ई-स्कूटर वापरते, जे डिटर्जंट, पाणी आणि ब्रशेस सारख्या सामग्रीने सुसज्ज आहेत. त्यात स्प्रे बाटली असते, ज्यामध्ये वॉशिंग सोल्यूशन असते.
गेल्या अनेक वर्षांपासून दुबईमध्ये असे दिसून आले आहे की तिथले लोक रस्त्याच्या कडेला वाहने पार्क करतात आणि लांब सुट्टीवर जातात. अनेक दिवस वाहने रस्त्याच्या कडेला उभी राहिल्यास त्यावर धूळ साचते. त्यामुळे दुबईत धुळीने माखलेल्या किंवा घाणेरड्या वाहनांवर दंड आकारला जाऊ लागला.
दुबईमध्ये 2019 पासून अस्वच्छ वाहनांवर दंड आकारण्यास सुरुवात झाली. त्यामागचे सर्वात मोठे कारण होते शहराची प्रतिमा. गेल्या अनेक वर्षांमध्ये, दुबई हे एक प्रमुख पर्यटन आणि व्यवसाय केंद्र म्हणून उदयास आले आहे, त्यानंतर तेथे परदेशी पाहुण्यांचा ओघ झपाट्याने वाढला आहे. त्यामुळे दुबई सरकारने अस्वच्छ वाहनांवर दंड आकारण्यास सुरुवात केली.