
पाकिस्तान क्रिकेट संघाने भारताला 2011 चा विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन यांची नवे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. पाकिस्तानला ICC ट्रॉफी जिंकून 7 वर्षे झाली आहेत. 2017 मध्ये भारताचा पराभव करून चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. येत्या तीन वर्षांत आयसीसीच्या तीन मोठ्या स्पर्धा होणार आहेत, ज्यात दोन T20 विश्वचषक आणि एक चॅम्पियन्स ट्रॉफीचा समावेश आहे. मात्र गेल्या काही काळापासून त्यांच्या क्रिकेट संघाची आणि देशाची अवस्था अत्यंत वाईट चालली आहे. अलीकडेच संघात फूट पडल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यामुळे संघाचे मोठे नुकसान झाले आहे. आता गॅरी कर्स्टन यांची प्रशिक्षकपदी नियुक्ती केल्यानंतर आगामी तीन स्पर्धांमध्ये संघ चांगली कामगिरी करेल, अशी आशा आहे. कर्स्टनने प्रशिक्षक बनताच बाबर आझमच्या संघाला ट्रॉफी जिंकण्याचे लक्ष्य दिले आहे.
‘ट्रॉफी जिंकण्याची शाश्वती नाही…’ पाकिस्तानचा प्रशिक्षक होताच गॅरी कर्स्टनने सांगितली मोठी गोष्ट
गॅरी कर्स्टन सध्या आयपीएलमध्ये गुजरात टायटन्ससाठी मेंटर म्हणून काम करत आहे. रविवारीच त्यांची 2026 पर्यंत एकदिवसीय आणि टी-20 साठी पाकिस्तान क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याच्या देखरेखीखाली पाकिस्तान 2024 मध्ये T20 विश्वचषक, 2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2026 मध्ये पुन्हा T20 विश्वचषक खेळणार आहे. आता हे पाहून कर्स्टनने किमान एक ट्रॉफी जिंकण्याचे लक्ष्य पाकिस्तानी संघासमोर ठेवले आहे. या तिन्हीपैकी संघांने एकही ट्रॉफी जिंकली, तर ते मोठे यश असेल, असे ते म्हणाले. दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज कर्स्टन इंग्लंड दौऱ्यापूर्वी 22 मेपासून आपली नवी जबाबदारी स्वीकारणार आहे. अशा परिस्थितीत वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत 2024 साली होणारा टी-20 विश्वचषक हा त्यांच्यासाठी पहिला आणि सर्वात मोठा प्रोजेक्ट असेल.
गॅरी कर्स्टनने ट्रॉफी जिंकण्याचे लक्ष्य ठेवले असले, तरी त्याची खात्री देता आलेली नाही. त्यापेक्षा पाकिस्तानची कामगिरी उच्च पातळीवर नेली जाईल, असे म्हटले आहे. तो म्हणाला की, कोणतीही ट्रॉफी जिंकणे सोपे नसते आणि याची शाश्वती नसते, पण चांगली कामगिरी करून तुम्ही स्वत:ला त्यासाठी सर्वोत्तम संधी देऊ शकता. सध्या विश्वचषकाच्या तयारीसाठी वेळेचा अभाव असल्याचे त्याने म्हटले आहे. पण पाकिस्तानी संघ समजून घेण्यात व्यस्त असून, खेळाडूंना भूमिका देऊन चांगली कामगिरी करायला लावणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
