टॅटूमुळे पसरत आहे HIV ! वाराणसीमध्ये आढळले 26 युवक पॉझिटिव्ह, तपासात गुंतली टीम


आजकाल तरूणांमध्ये शरीरावर टॅटू बनवण्याची प्रचंड क्रेझ आहे. उत्तर प्रदेशातील वाराणसी जिल्ह्यात टॅटू काढल्यानंतर 26 जणांना एचआयव्हीची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केस स्टडी आणि मागील इतिहासाच्या आधारे, टॅटू काढल्यानंतर एचआयव्ही संसर्ग होण्याची शक्यता असते. एकाच सुईने वारंवार टॅटू बनवल्याने संसर्ग होण्याचा धोका असतो. दरम्यान, स्वस्त दुकाने आणि गर्दीच्या ठिकाणी टॅटू काढणे टाळण्याचा सल्ला डॉक्टरांच्या पथकाने दिला आहे.

पूर्वांचलच्या आझमगड, मिर्झापूर आणि वाराणसी विभागातील दहा जिल्ह्यांमध्ये 26,890 एचआयव्ही बाधित लोक आहेत. यातील 50 टक्के लोकांचे वय 20 ते 45 वर्षांच्या दरम्यान आहे. टॅटू काढल्यानंतर संसर्ग झाल्याचा संशय असलेले 40 लोक आढळले आहेत.

वाराणसीतील 26 लोकांना टॅटू गोंदवल्यानंतर एचआयव्ही संसर्ग झाल्याचे सांगण्यात येत आहे. वाराणसीच्या एआरटी सेंटरच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रीती अग्रवाल यांनी सांगितले की, या 26 एचआयव्ही पॉझिटिव्ह लोकांच्या केस स्टडीच्या आधारे त्यांनी हा निष्कर्ष काढला आहे.

त्या म्हणाल्या की एचआयव्ही संसर्गाची तीन मुख्य कारणे म्हणजे असुरक्षित लैंगिक संबंध, संक्रमित रक्त संक्रमण आणि त्याच सुई किंवा सिरिंजमधून औषधे घेणे. या 26 लोकांनी समुपदेशनादरम्यान सांगितले की, ते फक्त या तीन कारणांपासून दूर राहत आहेत. त्यानंतर डॉक्टरांचे लक्ष त्याच्या शरीरावरील टॅटूकडे वेधले गेले. या सर्व 26 जणांच्या अंगावर टॅटू होते.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, टॅटू बनवणारे चुकीच्या सुया वापरत आहेत. टॅटू बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सुईची किंमत 1200 रुपये प्रति सुई आहे. असे असतानाही चौकाचौकात 200 रुपयांत टॅटू बनवले जात आहेत. याचा अर्थ आरोग्याशी थेट खेळ केला जात आहे. सुईचा वारंवार वापर हे देखील संसर्गाचे एक प्रमुख कारण आहे.

आरोग्य विभागामार्फत प्रत्येक जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये एआरटी केंद्रे चालवली जातात. येथे एचआयव्ही बाधित लोकांची नोंदणी केली जाते, त्यानंतर आवश्यक चाचण्या आणि उपचारांची व्यवस्था केली जाते. 10 जिल्ह्यांतील एआरटी केंद्रांच्या तपासणीत बाधितांची संख्या वाढल्याचे समोर आले आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही