पाकिस्तानचा भारताची ‘कॉपी’ करण्याचा प्रयत्न, विश्वचषक जिंकण्यासाठी या अनुभवी खेळाडूची केली प्रशिक्षकपदी नियुक्ती


दर महिन्याला काही न काही बदल करणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट संघाने एक मोठा बदल केला आहे T20 विश्वचषकापूर्वी एक मोठी नियुक्ती झाली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भारताला विश्वविजेता बनवणारे अनुभवी दक्षिण आफ्रिकेचे गॅरी कर्स्टन यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने कायमस्वरूपी मुख्य प्रशिक्षकाची नियुक्ती केली आहे. विशेष बाब म्हणजे यावेळी पाकिस्तानने मर्यादित षटकांसाठी आणि कसोटी फॉर्मेटसाठी वेगवेगळे प्रशिक्षक नियुक्त केले आहेत.

नवीन पीसीबी प्रमुख मोहसिन नक्वी यांनी रविवारी 28 एप्रिल रोजी पत्रकार परिषदेत नवीन कोचिंग स्टाफच्या नियुक्तीची घोषणा केली. 2011 मध्ये भारताला विश्वविजेता बनवणारा गॅरी कर्स्टन मे महिन्यात इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेपासून कामाला सुरुवात करणार आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज जेसन गिलेस्पी याला रेड बॉल संघाचा मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले आहे. ऑगस्टमध्ये बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेपासून त्याचा कार्यकाळ सुरू होईल.


गतवर्षी एकदिवसीय विश्वचषकात पाकिस्तानी संघाच्या दारुण पराभवानंतर बोर्डाने कोचिंग स्टाफमध्ये मोठे बदल केले होते. क्रिकेटचे संचालक मिकी आर्थर, मुख्य प्रशिक्षक ग्रँड ब्रॅडबर्न आणि त्यांचे सहाय्यक प्रशिक्षक राष्ट्रीय क्रिकेट अकादमीकडे पाठवण्यात आले आणि त्यानंतर सर्वांनी जानेवारीत राजीनामा दिला होता. या काळात पाकिस्तानी संघाची जबाबदारी तात्पुरत्या स्वरूपात वेगवेगळ्या माजी खेळाडूंवर देण्यात आली होती. मात्र पीसीबीचे नवे प्रमुख नक्वी यांच्या आगमनाने कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची घोषणा करण्यात आली आहे.

पाकिस्तानी संघ सध्या घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिका खेळत आहे, ज्यासाठी माजी अष्टपैलू अझहर महमूदला प्रशिक्षक बनवण्यात आले आहे. कर्स्टन आणि गिलेस्पी आल्यानंतरही महमूद पाकिस्तानी संघाशी संबंधित राहणार आहेत. त्याला सर्व फॉरमॅटमध्ये सहाय्यक प्रशिक्षक बनवण्यात आले आहे. या तिन्ही प्रशिक्षकांना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने 2 वर्षांचा करार दिला आहे. म्हणजेच या विश्वचषकाशिवाय कर्स्टन पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीपर्यंत आणि त्यानंतर 2026च्या टी-20 विश्वचषकापर्यंत संघाचे प्रशिक्षक असतील.