DRDO ने बनवले देशातील सर्वात हलके बुलेटप्रूफ जॅकेट, काय आहे खास


संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) च्या युनिटने उच्च पातळीच्या धोक्यांपासून संरक्षणासाठी देशातील सर्वात हलके बुलेटप्रूफ जॅकेट विकसित केले आहे. हे जॅकेट नवीन डिझाइन पद्धतीवर आधारित आहे, जेथे नवीन प्रक्रियेसह आधुनिक उत्पादन सामग्री वापरली गेली आहे. टर्मिनल बॅलिस्टिक रिसर्च लॅबोरेटरी (TBRL), चंदिगड येथे या जॅकेटची यशस्वी चाचणी घेण्यात आली.

संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात या जॅकेटची माहिती देण्यात आली आहे. डीआरडीओने नव्याने विकसित केलेल्या या जॅकेटला देशातील आतापर्यंतचे सर्वात हलके बुलेटप्रूफ जॅकेट मानले आहे. नवीन तंत्रज्ञानासोबतच या जॅकेटमध्ये काही गोष्टीही लावण्यात आल्या आहेत, ज्यामुळे त्याचे वजन पूर्वीच्या जॅकेटच्या तुलनेत कमी आहे. वजन कमी केल्यानंतर, ते सहा उच्च पातळीच्या धोक्यांपासून संरक्षण करण्यास सक्षम आहे.

मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, हे जॅकेट डीआरडीओच्या डिफेन्स मटेरियल अँड स्टोअर्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट, कानपूर यांनी तयार केले आहे. हे बुलेटप्रूफ जॅकेट 7.62 X 54 R API दारुगोळ्यापासून संरक्षण प्रदान करण्यास सक्षम आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे नवे बुलेट प्रूफ जॅकेट अशा प्रकारे डिझाइन करण्यात आले आहे की, सुरक्षा दलाच्या जवानांना ते परिधान करणे सोपे जाईल. नवीन बुलेट प्रूफ जॅकेटचे छायाचित्रही डीआरडीओने प्रसिद्ध केले आहे. सध्या सुरक्षा दलांकडून वापरलेली जॅकेट वजनाने खूप जड आहेत. अशा स्थितीत सतत परिधान करून कर्तव्य बजावण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात.

एकीकडे, DRDO ने देशातील सर्वात हलके बुलेट प्रूफ जॅकेटचे फोटो प्रसिद्ध केले, तर दुसरीकडे, भारताने मंगळवारीच मध्यम श्रेणीच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या नवीन आवृत्तीची यशस्वी चाचणी घेतली. स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड अंतर्गत या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. यशस्वी चाचणीसह क्षेपणास्त्राने वापरलेल्या नवीन तंत्रज्ञानाचे प्रमाणीकरण देखील केले. मात्र, हे क्षेपणास्त्र ‘अग्नी’ वर्गाच्या शस्त्र प्रणालीशी संबंधित नाही.

यापूर्वी, डीआरडीओनेही अलीकडेच क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली होती. DRDO ने चंडीपूर, ओडिशातील एकात्मिक चाचणी केंद्रातून स्वदेशी बनावटीच्या क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली होती. चाचणीनंतर डीआरडीओने एक निवेदन जारी करून चाचणी यशस्वी झाल्याचे घोषित केले.