‘डेडली’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या या क्रिकेटपटूचे निधन, घेतल्या होत्या 3000 हून अधिक विकेट


इंग्लंडचे महान क्रिकेटपटू आणि फिरकी गोलंदाज डेरेक अंडरवूड यांचे वयाच्या 78 व्या वर्षी निधन झाले. त्यांची काउंटी टीम केंटने ही माहिती दिली. डेरेक अंडरवुड ‘डेडली’ म्हणून प्रसिद्ध होते आणि त्यांनी अगदी लहान वयातच आपल्या गोलंदाजीने खळबळ उडवून दिली होती. त्यांनी वयाच्या 17 व्या वर्षी कौंटी संघ केंटमधून आपल्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली. पुढील तीन दशकांत त्यांनी एकूण 1087 सामने खेळले, ज्यामध्ये त्यांनी 3037 विकेट घेतल्या. इंग्लंडकडून खेळताना डेरेक अंडरवूडने 86 कसोटी सामन्यात 297 विकेट घेतल्या.

डेरेक अंडरवुड हा इंग्लंडच्या इतिहासातील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक आहे. इंग्लंडकडून विकेट घेण्याच्या बाबतीत ते सहाव्या स्थानावर आहेत. फिरकी गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले, तर त्याच्या पुढे कोणी नाही. प्रसिद्ध ऑफस्पिनर ग्रॅहम स्वान (255) हा देखील त्यांच्या मागे आहे. अंडरवुडने आपल्या कारकिर्दीत केवळ 26 एकदिवसीय सामन्यांमध्ये भाग घेतला असला, तरी पहिल्या विश्वचषकात (1975) त्यांनी आपल्या चमकदार कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. संपूर्ण स्पर्धेत त्यांनी 22.93 च्या उत्कृष्ट सरासरीने 32 बळी घेतले.

क्रिकेटच्या जगात प्रवेश करताच अंडरवूड यांनी विक्रम करायला सुरुवात केली. कौंटी क्रिकेटमध्ये केंटकडून खेळताना त्यांनी एका मोसमात 100 बळी घेतले. अशी कामगिरी करणारे ते सर्वात तरुण गोलंदाज ठरले. 1963 मध्ये वयाच्या 18 व्या वर्षी त्यांनी ही कामगिरी केली होती.

इंग्लंडच्या विजयात डेरेक अंडरवुड यांनी 15 च्या उत्कृष्ट सरासरीने 123 विकेट घेतल्या. या काळात त्यांनी दहा वेळा पाच किंवा त्याहून अधिक बळी घेतले. त्यांनी 676 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 2465 बळी घेतले आहेत आणि 411 लिस्ट ए सामन्यांमध्ये 572 विकेट्स घेतल्या आहेत.

डेरेक अंडरवूड यांना इंग्लंडचा सर्वोत्कृष्ट फिरकीपटू म्हटले जाते, त्यांचे चेंडू इतके धोकादायक होते की ते हरलेल्या खेळाचे रूपांतर विजयात करत असे. त्यांनी आपल्या करिष्माई गोलंदाजीने संघाला अनेक वेळा विजय मिळवून दिला, ज्यात 1968 मध्ये ओव्हलवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला गेलेला सामनाही होता. या सामन्यात त्यांनी तेच केले, जे कुणाला अपेक्षित नव्हते. सामना संपायला फक्त 5 मिनिटे बाकी होती, बरोबरीची अपेक्षा सर्वाधिक होती. पण इंग्लंडने शेवटची विकेट घेत विजय मिळवला. या सामन्याच्या दुसऱ्या डावात त्यांनी 50 धावांत 7 बळी घेतले.