IPL 2024 : केकेआरचा 25 कोटींच्या खेळाडूपेक्षा 20 लाख रुपयांच्या खेळाडूवर आहे सर्वात जास्त विश्वास


आयपीएल 2024 च्या मेगा लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने 24.75 कोटी रुपये देऊन विश्वचषक विजेत्या संघाचा भाग असलेल्या मिचेल स्टार्कला आपल्या संघात समाविष्ट केले. आयपीएलच्या इतिहासात कोणत्याही फ्रँचायझीने एवढी मोठी रक्कम दिली नव्हती. या ऑस्ट्रेलियन गोलंदाजाची विश्वचषकातील कामगिरी पाहता, तो केकेआरचा सर्वात विश्वासार्ह गोलंदाज असेल असे वाटले होते. पण त्याच्या आतापर्यंतच्या कामगिरीवरून आणि व्यवस्थापनाच्या निर्णयावरून असे दिसते की संघाला त्याच्यावर तेवढा विश्वास नाही, जितका त्यांनी लिलावात दाखवला होता. दुसरीकडे 20 लाखांचा अनकॅप्ड खेळाडू हर्षित राणा गंभीरचा विश्वास जिंकण्यात यशस्वी ठरला आहे.

मिचेल स्टार्कला अद्याप आपली योग्यता सिद्ध करता आलेली नाही. मात्र, लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात त्याने शानदार गोलंदाजी केली. केकेआरच्या घरच्या मैदानावर खेळताना स्टार्कने 4 षटकात 28 धावा देत 3 बळी घेतले. पण 5 सामन्यांतील त्याची कामगिरी पाहिली, तर तो कमी विकेट घेण्यासोबतच खूप महागडा ठरला आहे. दुसरीकडे, हर्षित राणाने आपल्या कामगिरीने संघाचा विश्वास जिंकला आहे. गेल्या काही सामन्यांचे विश्लेषण करताना माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्राने म्हटले आहे की, केकेआरला स्टार्कपेक्षा हर्षित राणावर अधिक विश्वास आहे. तो म्हणाला की, स्टार्कने लखनौविरुद्ध चांगली गोलंदाजी केली होती, तरीही त्याला डेथ ओव्हर्समध्ये फक्त एक ओव्हर देण्यात आली होती, तर हर्षितने 2 ओव्हर टाकल्या. त्याला एकही विकेट मिळाली नाही, पण चांगली गोलंदाजी केली.

याआधी स्टार्क सीएसकेविरुद्ध महागडा ठरला होता. या सामन्यात हर्षित राणा खेळू शकला नाही. आरसीबीविरुद्ध त्याने 4 षटकांत 47 धावा दिल्या, तर हर्षित राणाने 38 धावांत 2 बळी घेतले. या हंगामात, स्टार्कची इकोनॉमी (10.11) हर्षित राणाच्या इकोनॉमीपेक्षा (8.92) जास्त होती. हर्षितने 4 सामन्यात 5 बळी घेतले आहेत, तर स्टार्कने 5 सामन्यात 5 बळी घेतले आहेत. डेथ ओव्हर्समध्येही हर्षित राणाने त्याच्यावर जास्त प्रभाव असल्याचे सिद्ध केले आहे.

मंगळवारी कोलकाता नाईट रायडर्सचा सामना राजस्थान रॉयल्सशी होणार आहे. पॉइंट टेबलमध्ये आरआर पहिल्या स्थानावर आहे, तर केकेआर दुसऱ्या स्थानावर आहे. हा सामना फलंदाजी विरुद्ध गोलंदाजीचा असू शकतो, कारण KKR हा या हंगामात दुसरा सर्वोत्तम धावा करणारा संघ आहे. तर राजस्थान संघ इकोनॉमीच्या दृष्टीने सर्वोत्तम संघ आहे.