वेदनेत होता मथिशा पाथिराना, धोनीच्या एका सल्ल्याने मोडला CSK चा हा विक्रम


IPL 2024 चा सर्वात स्फोटक सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 207 धावांचे लक्ष्य दिले होते. वानखेडेची खेळपट्टी आणि मुंबईची फलंदाजी लक्षात घेता, हे लक्ष्यही लहान मानले जात होते. पण बेबी मलिंगा या नावाने प्रसिद्ध असलेला श्रीलंकेचा गोलंदाज मथिशा पाथिरानाच्या घातक गोलंदाजीमुळे सीएसकेला त्याचा बचाव करण्यात यश आले. पाथिराना 4 विकेट घेत या सामन्याचा हिरो ठरला. यासह त्याने नवा इतिहास रचला आहे. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून 4 बळी घेणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.

मथिशा पाथिरानाने मुंबईविरुद्ध 4 षटकात केवळ 28 धावा देत 4 बळी घेतले. सीएसकेसाठी अशी कामगिरी करणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. बेबी मलिंगाने वयाच्या अवघ्या 21 वर्षे 118 दिवसांत ही कामगिरी केली आहे. याआधी हा विक्रम श्रीलंकेचा खेळाडू महिश तिक्ष्णाच्या नावावर होता. तिक्ष्णानाने वयाच्या 21 वर्षे 254 दिवसांत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध हा विक्रम केला. त्याच्याशिवाय लुंगी एनगिडी (22 वर्षे 52 दिवस) आणि रवींद्र जडेजाने (23 वर्षे 123 दिवस) चेन्नईकडून खेळताना ही कामगिरी केली आहे.

या सामन्यापूर्वी मथिशा पाथिराना दुखापतग्रस्त झाला होता, त्यामुळे त्याला 2 सामन्यांसाठी संघाबाहेर राहावे लागले होते. मुंबईविरुद्धच्या डेथ ओव्हर स्पेलसाठी त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. हा पुरस्कार मिळाल्यानंतर पाथिरानाने सांगितले की, दुखापतीमुळे तो सामन्यापूर्वी खूप घाबरला होता. यानंतर धोनीने त्याला शांत राहण्याचा आणि गोष्टी साध्या ठेवण्याचा सल्ला दिला. यानंतर त्याने निकालाची चिंता न करता केवळ आपल्या गोलंदाजीवर लक्ष केंद्रित केले आणि चांगली कामगिरी केली. पाथिरानाने चेन्नईच्या स्टाफचे त्याला मोटिव्हेट आणि प्रेरणा दिल्याबद्दल आभार मानले. त्याने सांगितले की त्यांच्यामुळेच तो पुन्हा फॉर्ममध्ये येऊ शकला.

208 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबई संघाने डावाची सुरुवात धमाकेदार केली. दोन्ही सलामीवीर इशान किशन आणि रोहित शर्मा 10 च्या रेटने धावा करत होते. दोघांनी मिळून 7 षटकात 70 धावा केल्या होत्या. सातव्या षटकापर्यंत सामना चेन्नईच्या हातातून निसटल्याचे दिसत होते. पण पाथिरानाच्या एका षटकाने सामन्याचा रंगत बदलली. आठव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मथिशा पाथिरानाने इशान किशनला बाद केले. त्याच षटकात त्याने सूर्यकुमार यादवलाही बाद केले. यानंतर 150 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने खेळणाऱ्या तिलक वर्माची विकेट घेण्यातही पाथिरानाला यश आले. शेवटच्या षटकांमध्येही त्याने रोहित शर्माला धाव घेऊ दिली नाही आणि चेन्नईला विजयापर्यंत नेले.