रोहित शर्माला 3 वर्षांनंतर पूर्ण करायचे आहे हे स्वप्न, सांगितले त्याचे निवृत्तीबाबतचे इरादे


भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या बॅटने गेल्या काही महिन्यांपासून बरीच आतषबाजी केली आहे. रोहित प्रत्येक फॉरमॅटमध्ये सतत धावा करत आहे. सध्या तो इंडियन प्रीमियर लीगच्या 17 व्या मोसमात मुंबई इंडियन्ससाठी तुफानी फलंदाजी करत आहे. रोहितची ही कामगिरी अशा वेळी समोर येत आहे, जेव्हा त्याच्या वयाची आणि निवृत्तीबद्दल अनेकवेळा चर्चा रंगल्या होत्या, पण खुद्द भारतीय कर्णधाराला याबद्दल काय वाटते? याचे उत्तरही आता मिळाले असून रोहितने पुढील काही वर्षे खेळण्याचा आपला इरादा स्पष्ट केला आहे, कारण त्याला त्याचे एक स्वप्न अजून पूर्ण करायचे आहे.

गेल्या वर्षी टीम इंडियाला विश्वचषक विजेतेपदाच्या अगदी जवळ नेणारा कर्णधार रोहित शर्माने अजूनही आशा सोडलेली नाही. 30 एप्रिल रोजी 37 वर्षांचा होणारा रोहित अजूनही देशासाठी एकदिवसीय विश्वचषक जिंकू इच्छित आहे, जो काही महिन्यांपूर्वी त्याच्या हातातून निसटले होता. रोहितने एका मुलाखतीत त्याचे स्वप्न आणि क्रिकेटच्या भविष्याबद्दल खुलासा केला आहे.

रोहित शर्माने प्रसिद्ध शो होस्ट गौरव कपूरच्या यूट्यूब शो ‘ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स’ मध्ये त्याच्या भविष्याविषयी प्रश्नांची उत्तरे दिली. रोहितने स्पष्ट केले की आयुष्य त्याला भविष्यात कुठेतरी घेऊन जाऊ शकते, परंतु किमान सध्या तरी तो निवृत्तीचा विचार करत नाही. आपल्या सध्याच्या फॉर्मचा उल्लेख करताना तो म्हणाला की, सध्या तो चांगली फलंदाजी करत आहे आणि त्यामुळे आणखी काही वर्षे खेळत राहू इच्छितो. त्यानंतर रोहितने त्याच्या सर्वात मोठ्या स्वप्नाबद्दल सांगितले की त्याला 2027 चा एकदिवसीय विश्वचषक जिंकायचा आहे.

भारताने शेवटचा 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता, पण रोहित शर्मा त्या टीम इंडियाचा भाग नव्हता. यानंतर, रोहितने 2015 आणि 2019 च्या विश्वचषकात दमदार कामगिरी केली, परंतु तरीही संघ उपांत्य फेरीच्या पुढे जाऊ शकला नाही. तर 2023 मध्ये रोहित संघाचा कर्णधार होता आणि त्याने स्वतः शानदार फलंदाजी केली, पण अंतिम फेरीत संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला. आता पुढील विश्वचषक 2027 मध्ये दक्षिण आफ्रिका, नामिबिया आणि झिम्बाब्वे येथे खेळवला जाईल. तोपर्यंत 40 वर्षांचा असलेला रोहित टीम इंडियाचा भाग राहील का? विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न तो पूर्ण करू शकेल का? हे वेळच सांगेल.