फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीत स्थान मिळवणारा हा आहे भारतातील एकमेव तरुण अब्जाधीश


फोर्ब्सने नुकतीच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. या यादीत मुकेश अंबानीपासून गौतम अदानीपर्यंत भारतातील आघाडीच्या उद्योगपतींच्या नावांचा समावेश आहे. त्याचवेळी झिरोधाचे सह-संस्थापक निखिल कामथ यांचाही भारतातील एकमेव तरुण अब्जाधीश म्हणून या यादीत समावेश करण्यात आला आहे. फोर्ब्सनुसार, 37 वर्षीय निखिल कामथ हा भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश आहे.

फोर्ब्सच्या टॉप 100 यादीत निखिल 44 व्या क्रमांकावर आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, एकेकाळी निखिलला 8000 रुपये पगार मिळायचा, पण आज तो कोट्यवधींचा मालक आहे. त्याच्याकडे किती संपत्ती आहे, ते आम्ही तुम्हाला सांगतो.

निखिल कामथने त्याचा भाऊ नितीन सोबत 2010 मध्ये झिरोधाची सुरुवात केली. फोर्ब्सनुसार, निखिलची संपत्ती 4.6 अब्ज डॉलर आहे. त्याच वेळी, दोन्ही भावांची एकूण संपत्ती सुमारे 5.5 अब्ज डॉलर्स आहे. निखिल कामथ हे ट्रू बीकन आणि गृहचेही सह-संस्थापक देखील आहेत. अलीकडेच निखिल कामथने “WTF फंड” उपक्रमाची घोषणा केली होती, जी नवोदित उद्योजकांना फॅशन, सौंदर्य आणि होम ब्रँड्स यांसारख्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्याची संधी देते.

8,000 रुपयांच्या पगारापासून सुरुवात करून, झिरोधाचे सह-संस्थापक निखिल कामथ, ज्यांना आज दरमहा 6 कोटी रुपये आणि वार्षिक 72 कोटी रुपये पगार मिळतो, ते कठोर परिश्रमाच्या जोरावर यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी ओळखले जातात. 8,000 रुपयांच्या नोकरीपासून ते अब्जाधीश होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास खूप रंजक आहे. आपल्या करिअरच्या प्रवासाबद्दल बोलताना निखिल कामथने ह्युमन्स ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, त्याने वयाच्या 17 व्या वर्षी काम करायला सुरुवात केली. त्यांची पहिली नोकरी एका कॉल सेंटरमध्ये होती, जिथे त्यांना फक्त आठ हजार रुपये पगार मिळत होता.

फोर्ब्सच्या भारतातील अब्जाधीशांच्या टॉप 100 यादीत अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी पहिल्या स्थानावर आहेत. तर LVMH चे मालक बर्नार्ड अर्नॉल्ट जगभरात पहिल्या क्रमांकावर आहेत.