वासरू रूपाने जन्माला आले महादेव


भारत हा अभूतपूर्व देश आहे हे पुन्हा एकवार सिद्ध होण्याची घटना तामिळनाडूतील कोलाथूर गावी घडली आहे. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी सतत आग्रही असणार्‍या सरकारपुढे या घटनेने नवीनच पेच निर्माण केला आहे. हकीकत अशी की येथील रहिवासी राजेश यांच्या गाईने तीन डोळ्यांच्या वासराला जन्म दिला आहे आणि हा शिवाचा अवतार असल्याचे मानून केवळ या गावातीलच नव्हे तर आसपासच्या गावातील नागरिकही येथे येऊन त्याचे दर्शन घेत आहेत आणि पूजा अर्चा करत आहेत.

हे तीन डोळ्यांचे वासरू अगदी निरोगी आहे. भारतीय संस्कृतीत एकच देव असा आहे ज्याला तीन डोळे आहेत. हा देव म्हणजे देवांचा देव महादेव. या वासराचा तिसरा डोळाही कपाळावरच आहे आणि शिवाप्रमाणेच तो सध्या मिटलेल्या स्थितीत आहे. त्यामुळे शिवानेच आपल्या गावात जन्म घेतल्याची येथील गावकर्‍यांची श्रद्धा आहे. या वासराची काळजी घेण्यासाठी स्वतंत्र नर्स नेमली गेली आहे. राजेश सांगतो हे वासरू १५ सप्टेंबरला जन्मले. तेव्हापासून घरात शांतता नांदते आहे, कोणीही आजारी पडले नाही इतकेच नव्हे तर जी कामे आजपर्यंत खोळंबून राहिली होती तीही कोणत्याही अडथळ्याविना पार पडत आहेत. वासराच्या रूपाने शिवच आमच्याकडे आले आहेत.

मात्र दिवसेदिवस या वासराची कीर्ती वाढतच चालल्याने त्याला पाहायला येणार्‍यांची संख्याही वाढत चालली आहे. त्याचाच थोडाफार त्रास राजेश यांना होतो आहे.