जपानी गुडियांना लग्न हवे, पण नवरा नको


जपानसारख्या चिमुकल्या देशाने उद्योग तंत्रज्ञानात जगात मिळविलेले स्थान, आर्थिक महाशक्ती म्हणून त्यांची होत असलेली वाटचाल कौतुकाचा विषय नक्कीच आहे. मात्र त्यासाठी जपानी लोकांनी पराकोटीचा त्यागही केला आहे. कष्ट, करियर याला सर्वाधिक महत्त्व देणार्‍या या लोकांनी प्रसंगी वैवाहिक जीवनाची आहुती देण्यासही मागेपुढे पाहिलेले नाही. याचमुळे जपानमध्ये सध्या एकट्या किंवा सिंगल जपानी ललनांची संख्या लक्षणीयरित्या वाढत चालली आहे.

याचा अर्थ असा नव्हे की या जपानी गुडिया लग्न करू शकणार नाहीत. उलट त्यांना आता अशी सुविधा दिली गेली आहे की त्या कधीही लग्न करू शकतात आणि त्यासाठी नवरा हवाच अशी अट अजिबात नाही. अनेक एजन्सींनी ही सोलो वेडिंगची संकल्पना सुरू केली असून त्याला जपानी मुलींकडून चांगला प्रतिसादही मिळतो आहे.

लग्नाची सारी हौस या समारंभात भागविली जाते. म्हणजे ज्या पद्धतीने लग्न व्हावे वाटत असेल तसा पारंपारिक वा आधुनिक वेडिंग ड्रेस, नट्टा पट्टा, पाहुणे, हवा तो भोजन मेनू, दागदागिने, रिसेप्शन अशी सर्व व्यवस्था या एजन्सी करतात. अगदी अभिनंदन करण्यासाठी पाहुणेही आणतात. लग्नासारखेच सर्व वातावरण असते. जपानी वधू हा एक दिवसाचा विवाह सोहळा एन्जॉय करतात, हव्या त्या ठिकाणी फोटो शूटही केले जाते आणि दुसरे दिवसापासून पुन्हा त्या कामावर हजर होतात. अशा तर्हेटने हा औट घटकेचा विवाह सोहळा संपन्न होतो.

हा ट्रेंड जपानमध्ये फारच लोकप्रिय होऊ लागला असल्याचे समजते. मात्र यामुळे जपान सरकारपुढे अडचण निर्माण झाली आहे. जपानमध्ये जन्मदर कमालीचा घसरला आहे आणि असल्या औट घटकेच्या लग्नांमुळे त्यात आणखीनच घट होईल अशी चिंता सरकारला भेडसावते आहे.