येथे बनतात सर्व बनावट आधुनिक शस्त्रे


जगात उपलब्ध असलेल्या सर्व धोकादायक आणि संहारक शस्त्रांची नक्कल हुबेहुब करण्यात पाकिस्तानातील अगदी छोटे गांव दर्रा आदम खेल कुख्यात गांव म्हणून प्रसिद्ध आहे. पेशावर आणि कोहट शहरांच्या मध्ये वसलेले हे छोटे गांव एकेकाळी ब्रिटीशांसाठी शस्त्रे बनवित असे आता मात्र येथून तालिबान आणि अफगाणिस्तानाला शस्त्रे पुरविली जातात.

विशेष म्हणजे या गावातील ७५ टक्के नागरिक या अवैध शस्त्र व्यवसायात आहेत. इतिहासातील नोंदीनुसार १८७५ सालापासून येथे अशी बनावट अवैध शस्त्रे बनविली जात असून आज या गावातील अनेक पिढ्या हाच व्यवसाय गेली कित्येक वर्षे करत आहेत. येथील कारागिरांनी या शस्त्रे उत्पादनात इतके प्राविण्य मिळविले आहे की मशीनगन्स, रायफलींपासून ते रॉकेट लाँचर पर्यंत सर्व संहारक शस्त्रे येथे बनतात आणि खुलेआम विकलीही जातात.

या गावातील २५०० नागरिक या व्यवसायात आहेत. गावातल्या छोट्या दुकानातही आधुनिक रिव्होल्व्हर, अॅटोमॅटिक पिस्तुल, शॉटगन सहजी मिळतात. या व्यवसायात लहान मुलेही काम करतात. जहाज बांधणीसाठी जो धातू वापरला जातो त्यापासून येथील शस्त्रे बनविली जातात आणि ओरिजिनल शस्त्रांपेक्षा ती खूपच स्वस्तात मिळत असल्याने त्यांना मोठी मागणीही आहे असे समजते.