IPL 2024 : हैदराबादने मुंबईचा केला 31 धावांनी पराभव, सामन्यात झाल्या 523 धावा


IPL 2024 च्या 8 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सचा पराभव केला. सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 277 धावांची विक्रमी धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात मुंबईचा संघ 246 धावाच करू शकला आणि हैदराबादने 31 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात मुंबईच्या फलंदाजांनी चांगली फलंदाजी करत हैदराबादला कडवी झुंज दिली असली, तरी अखेर विजय एसआरएचच्या नावावरच राहिला. या सामन्यात एकूण 523 धावा झाल्या, हा एक विश्वविक्रम आहे. या सामन्यात एकूण 38 षटकार मारले गेले, हा देखील एक विश्वविक्रम आहे.

सनरायझर्स हैदराबादचा विजय त्यांच्या फलंदाजांनीच ठरवला. हेनरिक क्लासेनने 34 चेंडूत सर्वाधिक नाबाद 80 धावा केल्या. क्लासेनच्या बॅटमधून 7 षटकार निघाले. अभिषेक शर्माने 23 चेंडूत 63 धावा केल्या, या खेळाडूने 7 षटकारही ठोकले. ट्रॅव्हिस हेडने 24 चेंडूत 62 धावा केल्या. याशिवाय एडन मार्करामने नाबाद 42 धावा केल्या.

अनुकूल विकेटवर फलंदाजी करत मुंबईच्या फलंदाजांनीही आपली ताकद दाखवली. तिलक वर्माने 34 चेंडूत 64 धावांची खेळी केली. टीम डेव्हिडनेही नाबाद 42 धावा केल्या. इशान किशनने 13 चेंडूत 34, तर नमन धीरने 14 चेंडूत 30 धावा करत हैदराबादला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. मात्र मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याच्या संथ खेळीने संघावर छाया पडली. पांड्याने केवळ 120 च्या स्ट्राईक रेटने 24 धावा केल्या.

मुंबई आणि हैदराबाद यांच्यातील सामन्यात गोलंदाजांची अवस्था वाईट होती. 50 पेक्षा जास्त धावा देणारे चार गोलंदाज होते. क्वेना माफाकाने सर्वाधिक 4 षटकांत 66 धावा दिल्या. जेराल्ड कोटजेयाने 4 षटकात 57 धावा दिल्या. भुवनेश्वर कुमारने 4 षटकात 53, तर मयंक मार्कंडेने 4 षटकात 52 धावा दिल्या.

मुंबई इंडियन्सला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले असून त्यामुळे त्यांची गुणतालिकेत 9व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. दुसरीकडे, सनरायडर्स हैदराबादने 31 धावांनी विजय मिळवत निव्वळ धावगती सुधारली आहे आणि आता गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे.