होळीच्या दिवशी होणाऱ्या धांगड धिगाण्याच्या विरोधात तारक मेहताची टीम, शोद्वारे देणार जोरदार संदेश


सध्या प्रत्येक टीव्ही मालिकेत होळी साजरी केली जात आहे. पण यावर्षी सोनी सब टीव्हीचा कॉमेडी शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ला वेगळ्या पद्धतीने होळी साजरी करायची आहे. होय, तारक मेहताच्या प्रॉडक्शन हाऊस ‘नीला टेलिफिल्म्स’ने शेअर केलेल्या माहितीमध्ये असे म्हटले आहे की, सहसा ते प्रेम, मजा आणि आनंदाने होळी साजरी करतात, पण इतरांची काळजी घ्या आणि प्रत्येकाचा आदर करा या संदेशासह यावेळी आम्ही होळी साजरी करणार आहोत.

याबाबत माहिती देताना तारक मेहताचे निर्माते असित कुमार मोदी म्हणाले की, आम्ही आमच्या मालिकेत होळी साजरी करून प्रेक्षकांना खूप चांगला संदेश देणार आहोत. वास्तविक, तारक मेहताच्या ताज्या कथानकात गुड्डू भैय्या आणि त्याचे काही मित्र जेठालालच्या गोकुळधाम सोसायटीमध्ये उत्सवाच्या नावाखाली लोकांना त्रास देत असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्याच्या या कृतीमुळे टप्पू सेनेला राग येतो, पण तरीही आपल्या रागावर नियंत्रण ठेवून तो गुड्डू भैय्याला आपण चुकीच्या मार्गावर चालत असल्याचे पटवून देण्याचा प्रयत्न करतो.

गुड्डू भैया टप्पू सेनेच्या बोलण्याला रागवतो आणि येत्या काही दिवसांत सोनूला त्रास देण्यासाठी आणि टप्पू सेनेला धडा शिकवण्यासाठी नवीन प्लॅन करतो, हे येत्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत. या ट्रॅकद्वारे ‘तारक मेहता..’ची टीम प्रेक्षकांना हा संदेश देण्याचा प्रयत्न करणार आहे की होळीच्या वेळी लोकांनी इतरांच्या निर्णयाचा आदर केला पाहिजे. ‘बुरा ना मानो, होली है’ असे सांगून मुली आणि महिलांना त्रास देणे चुकीचे आहे. तुम्ही नक्कीच मजा करू शकता, पण त्यात कोणाचाही अनादर होता कामा नये, होळी हा आनंदाचा, मौजमजेचा आणि प्रेमाच्या रंगांचा सण आहे, जिथे शत्रूही मित्र बनतात, त्यामुळे या निमित्ताने आनंद पसरवावा.