
हिंदू धर्मात तुम्ही भगवान विष्णू आणि प्रल्हाद यांच्या कथा ऐकल्या असतील की भगवान विष्णूने नरसिंहाचा अवतार घेऊन त्यांचा प्रिय भक्त प्रल्हाद यांचे प्राण वाचवले होते. भगवान विष्णूचा प्रत्येक अवतार अत्यंत खास असल्याचे धार्मिक ग्रंथांमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यांच्या प्रत्येक अवतारामागे काही ना काही मोठे कारण आहे. जेव्हा-जेव्हा धर्मावर अधर्माचा प्रादुर्भाव झाला, तेव्हा भगवान विष्णूंनी पृथ्वीवर वेगवेगळ्या रूपात अवतार घेऊन अधर्माचा नाश केला. आज आम्ही तुम्हाला नरसिंहाच्या अशाच एका मंदिराविषयी सांगणार आहोत. जिथे नरसिंहाच्या मूर्तीचे वर्षातून एकदाच दर्शन होते.
भारतातील या मंदिरात वर्षातून एकदाच का होते भगवान नरसिंह यांचे दर्शन? जाणून घ्या परंपरा
भगवान नरसिंहाच्या मंदिराबद्दल बोलायचे झाले तर, संपूर्ण भारतामध्ये भगवान नरसिंहाची अनेक मंदिरे आहेत, परंतु भगवान नरसिंहाचे एक मंदिर विशाखापट्टणमच्या सिंहाचल पर्वतावर आहे. जे देशभरात सिंहाचलम मंदिर म्हणून ओळखले जाते. सिंहाचलम मंदिराला भगवान नरसिंहाचे घर देखील म्हटले जाते. या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात माता लक्ष्मीसोबत भगवान नरसिंह विराजमान आहेत.
सिंहाचलम मंदिरात भगवान नरसिंह यांचे वर्षातून फक्त एकदाच दर्शन होते, कारण त्यांच्या मूर्तीला वर्षभर चंदनाचा लेप लावलेला असतो आणि हा चंदनाचा लेप वर्षातून एकदाच काढला जातो. भगवान नरसिंहाच्या मूर्तीवर लावलेला हा लेप अक्षय्य तृतीयेच्या दिवशी काढला जातो. त्या दिवशीच भाविकांना नरसिंह देवाची मूर्ती पाहायला मिळते. या मंदिराची स्थापना भक्त प्रल्हाद यांनी केली होती, असे मानले जाते.
पौराणिक मान्यतेनुसार, जेव्हा भगवान नरसिंहाने हिरण्यकश्यपचा वध केला, तेव्हा भक्त प्रल्हादने हे मंदिर बांधले. असे म्हणतात की कालांतराने ते मंदिर पृथ्वीच्या गर्भात विलीन झाले, राजा पुरुरवाने स्वतः पृथ्वीच्या गर्भात गेलेली नरसिंहाची मूर्ती बाहेर काढली, ती पुन्हा स्थापित केली आणि चंदनाच्या लेपाने झाकली. पुरुरवा नावाच्या राजाने या मंदिराची पुनर्बांधणी केली होती. याचा उल्लेख सिंहाचलम देवस्थानच्या अधिकृत संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
पौराणिक कथेनुसार हिरण्यकश्यपचा वध करताना भगवान नरसिंह खूप क्रोधित झाले होते. त्यामुळे त्याचा राग शांत करण्यासाठी चंदनाची लेप लावला गेला होता. त्यामुळे त्यांचा राग कमी झाला. तेव्हापासून भगवान नरसिंहाच्या मूर्तीला चंदनाचा लेप लावण्याची परंपरा चालत आली असून अक्षय्य तृतीयेच्या दिवशी हा चंदनाचा लेप वर्षातून एकदा काढला जातो. त्यानंतर वर्षातून एकदाच लोकांना भगवान नरसिंहाची वास्तविक मूर्ती पाहायला मिळते.
