Singham Again : रोहित शेट्टी-करीना कपूर पोहोचले 262 वर्ष जुन्या मंदिरात, या गावात सुरू आहे सिंघम अगेनचे शूटिंग


प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी त्याचा आगामी चित्रपट ‘सिंघम अगेन’च्या शूटिंगसाठी महाराष्ट्रातील ‘टेम्पल सिटी’मध्ये पोहोचला आहे. या चित्रपटात अजय देवगणसोबत करीना कपूर आणि अर्जुन कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा चित्रपटाचा शेवटचा टप्पा असू शकतो. शूटिंगच्या खास निमित्त रोहित शेट्टीच्या टीमने ‘वाई’ मंदिर परिसर पूर्णपणे उजळून टाकला असून या प्रकाशामुळे संपूर्ण घाट उजळून निघाला आहे. शूटिंग सुरू करण्यापूर्वी रोहित शेट्टी आणि करीना कपूर यांनी ‘वाई’ च्या 262 वर्ष जुन्या गणेश मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेतले.


महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील वाई गावात कृष्णा नदीच्या काठी ‘ढोल्या गणपती’चे मंदिर आहे. हे मंदिर श्री तीर्थ क्षेत्र आणि दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्व गणेशभक्तांचे हे आवडते ठिकाण आहे. दरम्यान गावकऱ्यांनी सांगितले की, रोहित शेट्टी जेव्हा जेव्हा शूटिंगसाठी ‘वाई’ मध्ये येतो, तेव्हा तो या गणेश मंदिरात नक्कीच येतो आणि देवाचे दर्शन घेतो. या मंदिरात करीना कपूर पहिल्यांदाच आली आहे.

केवळ रोहित शेट्टीच नाही तर अनेक बॉलिवूड आणि प्रादेशिक चित्रपटांचे शूटिंग ‘वाई’ गावात झाले आहे. निसर्ग, मंदिरे आणि किल्ले यासाठी ओळखल्या जाणाऱ्या या गावात बॉलीवूड, मराठी आणि भोजपुरीसह 250 हून अधिक चित्रपटांचे चित्रीकरण झाल्याचा गावकऱ्यांचा दावा आहे. शहनाई, राम तेरी गंगा मैली, सरगम, चेन्नई एक्सप्रेस, दबंग, सिंघम, इश्किया, ओमकारा, स्वदेश, गंगाजल या चित्रपटांचे चित्रीकरण येथे झाले आहे. या चित्रपटांमध्ये या गावातील अनेकांनी छोट्या-मोठ्या भूमिकाही साकारल्या आहेत.