या गायिकेने 28 वर्षांपूर्वी अनु मलिकवर केला होता लैंगिक शोषणाचा आरोप, त्यानंतर 6 वर्षांनी गायले एकत्र गाणे


बॉलीवूडमधील 80 च्या दशकाचा काळ असा होता, जेव्हा लोकांमध्ये काहीतरी नवीन करण्याची तीव्र इच्छा होती. 70 च्या दशकातील सुवर्णकाळानंतरचा हा काळ होता. अल्बम संस्कृती याच काळात आली. पूर्वी फक्त चित्रपटात गाणी होती. पण नंतर चित्रपट सोडून गाणी बनवली जाऊ लागली आणि त्यांचीच क्रेझ दिसू लागली. या सुरुवातीच्या टप्प्यात अलिशा चिनॉयही आली आणि ती येताच लोकप्रिय झाली. 80 च्या दशकात तिला क्वीन ऑफ इंडियन पॉप ही पदवी मिळाली होती. अलिशाचे मेड इन इंडिया हे गाणे आजही चर्चेत आहे. बरं, आज त्याच नावाने देशाचे पंतप्रधान मोदीजी यांची एक यशस्वी योजना आहे, ज्याद्वारे ते देशातील नागरिकांना स्टार्टअपसाठी प्रेरित करत आहेत.

अलिशा चिनॉयचा जन्म 18 मार्च 1965 रोजी अहमदाबाद, गुजरात येथे झाला. अलिशाच्या बॉलिवूड करिअरची सुरुवात 80 च्या दशकात झाली होती. अलिशा पॉप गाायची आणि तिचा आवाजही अनोखा होता. त्याच काळात बप्पी लाहिरी यांनी आपल्या अनोख्या पॉप शैलीने तिला स्वत:ची ओळख निर्माण करुन दिली होती. त्यांनीच अलिशाला बॉलिवूडमध्ये ओळख करून दिली आणि तिला ब्रेक दिला. दोघांनी एकत्र अनेक गाणी गायली.

अलिशाने तिच्या करिअरमध्ये अनेक लोकप्रिय अल्बम दिले. यामध्ये कामसूत्र, आह अलिशा, बेबी डॉल, बॉम्बे गर्ल आणि मेड इन इंडिया यांचा समावेश आहे. याशिवाय बॉलीवूडमध्ये तिने डान्स डान्स, मिस्टर इंडिया, त्रिदेव, विजयपथ, नो एंट्री, मर्डर, नमस्ते लंडन, कमबख्त इश्क आणि क्रिश 3 या चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत.

गायिका अलिशा चिनॉयने संगीत दिग्दर्शक अनु मलिकसोबतही चित्रपट केले. पण 1996 मध्ये अलिशाने अनु मलिकवर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. हा आरोप तिच्या मेड इन इंडिया या अल्बमच्या वेळी करण्यात आला होता. या वादानंतर दोघांमधील संबंध बिघडले. या काळात अनु मलिक यांची प्रतिमाही डागाळली गेली होती. पण 6 वर्षांनंतर दोघेही शाहिद कपूरच्या इश्क विश्क चित्रपटासाठी पुन्हा एकत्र आले आणि गाणे रेकॉर्ड केले. पण जेव्हा तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर मी टू चे आरोप केले होते, तेव्हा अलिशाने या प्रकरणावर पुन्हा प्रतिक्रिया दिली आणि त्यावेळी तिने अनु मलिकवर जे काही आरोप केले होते, ते शंभर टक्के खरे असल्याचे सांगितले. ही गायिका तिचा आज 59 वा वाढदिवस साजरा करत आहे आणि आता ती पूर्वीपेक्षा कमी गाणी गाते.