No Smoking Day : धूम्रपान थांबवण्याची तयारी… धूम्रपान बंद करण्यात कोणता देश किती पुढे आहे?


सामान्यत: लोकांचा असा विश्वास आहे की धूम्रपानामुळे फक्त धूम्रपान करणाऱ्यांसाठीच धोका असतो. पण तसे नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अहवालानुसार, धूम्रपानामुळे दरवर्षी 80 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू होतो. यापैकी 13 लाख असे लोक असतात, जे स्वत: धूम्रपान करत नाहीत, पण सेकंड हॅण्ड स्मोकमुळे त्यांची तब्येत बिघडते. धूम्रपानाबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी आणि लोकांना धूम्रपान सोडण्यासाठी प्रेरित करण्यासाठी दरवर्षी 13 मार्च रोजी धूम्रपान निषेध दिवस साजरा केला जातो.

सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) च्या मते, सिगारेट ओढल्याने शरीराच्या जवळपास सर्व अवयवांना हानी पोहोचते. धुम्रपानाच्या सवयीमुळे श्वास घेण्यास त्रास होण्याचा आणि प्राणघातक कर्करोग होण्याचा धोका असतो. धूम्रपानाचे धोके लक्षात घेऊन अनेक देशांनी कठोर कायदे केले आहेत. चला जाणून घेऊया अशा प्रमुख देशांबद्दल जिथे धूम्रपानाबाबत कडक आहेत कायदे.

आयर्लंड
29 मार्च 2004 रोजी, आयर्लंड हा कामाच्या ठिकाणी इनडोअर स्मोकिंगवर पूर्णपणे बंदी घालणारा जगातील पहिला देश बनला. हे केवळ कार्यालयापुरते मर्यादित नव्हते. रेस्टॉरंट्स आणि मनोरंजनाची ठिकाणेही कायद्याच्या कक्षेत आली. सुरुवातीला या कायद्याबद्दल आयरिश सरकारवर टीका झाली, पण त्याचे फायदे पाहिल्यानंतर जगभरातील देशांनी या धोरणांचे अनुकरण केले.

पोर्तुगाल
पोर्तुगालने 2040 पर्यंत ‘धूरमुक्त पिढी’ तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. गेल्या वर्षी तेथील संसदेत एक विधेयक मांडण्यात आले होते, कायदा झाल्यानंतर शाळा, विद्यापीठे, रुग्णालये किंवा सार्वजनिक इमारती, रेस्टॉरंट आणि बारसारख्या क्रीडा स्थळांबाहेर धूम्रपान करण्यास बंदी घालण्यात येणार आहे. कायद्यानुसार, 2025 पासून, विमानतळावरील परवानाधारक दुकानांनाच सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्याची परवानगी दिली जाईल. याचा अर्थ व्हेंडिंग मशिन, बार, रेस्टॉरंट आणि पेट्रोल स्टेशन्सना यापुढे त्यांची विक्री करण्याची परवानगी दिली जाणार नाही. 2030 नंतर, रेस्टॉरंट, बार आणि नाइटक्लबमधील स्वतंत्र धूम्रपान क्षेत्र देखील बेकायदेशीर होतील.

कॅनडा
2035 पर्यंत देशातील तंबाखूचा वापर 5% पेक्षा कमी करण्याचे कॅनडाचे उद्दिष्ट आहे. हे साध्य करण्यासाठी कॅनडा सरकार विविध प्रकारच्या योजनांवर विचार करत आहे. अहवालानुसार, तरुणांना धूम्रपान सोडण्यास प्रोत्साहित करण्यासाठी प्रत्येक सिगारेटवर इशारे छापणे सुरू करणारा कॅनडा हा पहिला देश असेल. एप्रिल 2025 पर्यंत सर्व आकाराच्या सिगारेटवर हा इशारा लिहिणे अनिवार्य असेल. लोकांना, विशेषत: तरुणांना धूम्रपान करण्यापासून रोखण्यासाठी हे पाऊल यशस्वी होईल, अशी प्रशासनाला आशा आहे.

ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलियामध्ये शाळा, कार्यालयीन इमारती, शॉपिंग मॉल्स आणि विमानतळ यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे बेकायदेशीर आहे. देशातील धूर-मुक्त कायद्यांसाठी राज्य आणि प्रादेशिक सरकारे प्रामुख्याने जबाबदार आहेत. त्यांच्या स्तरावर, ते कायदे आणतात, जे लोकांना सेकंड हँड धुरापासून संरक्षण देतात आणि लोकांना धूम्रपान सोडण्यास प्रोत्साहित करतात. ऑस्ट्रेलियन सरकार तंबाखू उत्पादनांना कमी परवडण्याजोगे बनवण्यासाठी त्यावर कर लादते.

युनायटेड किंगडम
युनायटेड किंगडममध्ये, पंतप्रधान ऋषी सुनक एक नवीन कायदा आणण्याचा विचार करत आहेत, ज्यामुळे 1 जानेवारी 2009 नंतर जन्मलेल्या लोकांना इंग्लंडमध्ये सिगारेट खरेदी करण्यापासून रोखता येईल. या तारखेनंतर जन्मलेल्या लोकांना सिगारेट किंवा तंबाखू विकणे बेकायदेशीर असेल. यामुळे 2040 पर्यंत तरुणांमधील धूम्रपान जवळजवळ पूर्णपणे संपुष्टात येईल, असा सरकारचा दावा आहे.